मुंबई : कंगना रनौत चौकशीत सहकार्य करत नाही त्यामुळे तिची आणखीन चौकशी करण्याची गरज आहे, असं हायकोर्टात स्पष्ट करत कंगना आणि रंगोलीला आणखीन किमान तीनवेळा चौकशीसाठी बोलावण्याची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी सोमवारी हायकोर्टात सांगितलं. मात्र वांद्रे पोलीस स्थानकात मुंबई पोलिसांकडनं झालेल्या चौकशीत कंगनानं पूर्ण सहकार्य केलं, अशी भूमिका तिच्या वकिलांनी हायकोर्टात मांडली. मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलेला दिलासा 25 जानेवारीपर्यंत कायम ठेवत तोपर्यंत त्यांना चौकशीलाही न बोलावण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. दरम्यानच्या काळात मुंबई पोलिसांनी आपला वेळ इतर गंभीर प्रकरणांना द्यावा असा टोलाही खंडपीठानं लागवला.


सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अपमानकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधातील हा एफआयआर रद्द करावा अशी मागणी करत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


काय आहे प्रकरण -


कंगनाची बहीण रंगोली हिने तबलिगी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं एक ट्विट केले होतं. सोशल मीडियावर त्यावर बराच विरोध आणि टीका सुरू होताच आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनानंही एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता. याप्रकरणी बॉलिवूडमधील एक कास्टिंग डायरेक्टर मुनावर अली सय्यद यांच्या तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनीही अंधेरी कोर्टात त्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारींची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच संबंधित व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती?, हे कळणं गरजेचं असल्यानं याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहेत.


कोर्टाच्या या निर्देशांनुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक तक्रार नोंदवली गेली. त्यानुसार कंगना व तिच्या बहिणी विरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्याच्या चौकशीसाठी दोन्ही बहीणी 8 जानेवारी रोजी दोन तासांसाठी वांद्रे पोलीस स्थानकांत हजर झाल्या होत्या. मात्र शूटिंगचं कारण देत यादोघींनी चौकशीला पुरेसा वेळ दिला नाही, असा आरोप सोमवारी सरकारी वकिलांनी हायकोर्टात केला. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाला आक्षेप घेत कंगनानं हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा तसेच पाठवलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करत अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत कंगना व तिची बहीण रंगोलीने याचिका दाखल केली आहे. तसेच जोपर्यंत यावर सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी विनंतीही कंगनाने या याचिकेद्वारे केली आहे.