सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने 128 आणि हनुमा विहारीने 161 चेंडू खेळून काढले. त्यामुळे भारताने या सामन्यात पराभव टाळला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही हनुमा विहारीने 161 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.
रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे विजय दृष्टीक्षेपात होता. विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयाची आस लागलेल्या भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला विकेट्स जाऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती. हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं.
सिडनीमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना रंगला. भारताला दुसऱ्या डावात 132 चेंडूंमध्ये 407 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने 131 षटकं फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 338 धावा केल्या. हेमस्ट्रिंग इंज्युरी असतानाही हनुमा विहारीने 161 चेंडूंचा सामना करत 23 धावांची नाबाद खेळी रचली. त्याला आर अश्विननेही उत्तम साथ दिली आणि नाबाद 39 धावा केल्या. या दोघांनी 43 षटकं खेळून भारताला सिडनी कसोटीत पराभवापासून वाचवलं.
हनुमा विहारी आणि आर अश्विनने सहाव्या विकेटसाठी 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी रचली. यामध्ये अश्विनने 39 धावांचं योगदान दिलं तर विहारीने 20 धावा केल्या. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी 43 पेक्षा जास्त षटकं खेळून काढली आणि सामना अनिर्णित केला.
एक षटक आधीच दोन्ही संघांची सामना संपवण्यावर सहमती झाली. सिडनी कसोटील ड्रॉ झाली असली तरी भारतासाठी हा निकाल मेलबर्नमधील विजायापेक्षा कमी नाही. भारताने हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांच्यासारख्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर तब्बल 131 षटकं फलंदाजी केली. तर आर अश्विनने वेगवान गोलंदाजांचा नेटाने सामना करुन भारताला पराभवापासून परावृत्त केलं. या सामन्यात 131 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. अखेरचा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्ब्रेनमध्ये खेळवला जाईल.