Kangana Ranaut : भाजपच्या (BJP) लोकसभा उमेदवारांच्या (Lok Sabha 2024) यादीमध्ये एक अपेक्षित नाव समोर आलं. अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. पण याच कंगनाने 10 महिन्यांपूर्वीच माझा कट्टावर तिच्या राजकारणातील एन्ट्रीचे संकेत दिले होते. त्यानंतर 10 महिन्यांत कंगनाला उमेदवारी जाहीर झाली.
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रानौत ही काही काळापासून बरीच चर्चेत आली आहे. त्यामुळे तिच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चांना उधाण आलं. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला लावलेली हजेरी, पंतप्रधान मोदींच्या कौतुकाच्या पोस्ट यामुळे कंगनाला भाजपकडून तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. भाजपच्या पाचव्या यादीतून तिच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
कंगनाने माझा कट्टावर दिले होते राजकारणातील एन्ट्रीचे संकेत
'तुम्ही मला अॅक्टर व्हायचं आहे, इंजिनिअर व्हायचंय असं म्हणून शकता. पण तुम्ही मला एक नेता व्हायचंय असं म्हणणं फार वल्गर थॉट वाटतो. पण जर मला राजकारणात यायचं असेल तर मी हा निर्णय जनतेवर आणि ज्यांच्याकडे मला उमेदवारी देण्याची पॉवर आहे त्या पक्षावर मी हा निर्णय सोडते. पण जर अशी जबाबदारी मला देण्यात आली, मला देशासाठी काहीतरी करणं हे गरजेचं झालं आणि देशाला माझी गरज निर्माण झाली तर मी नक्कीच येईन. त्यामुळे काय परिस्थिती आहे आणि मला कोणत्या पक्षाकडून संधी मिळते यावर मी तो निर्णय घेईल. पण देशाला गरज असेल तर मी नक्की निवडणूक लढवेन', असं कंगनाने म्हटलं होतं.
तिकीट मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया
लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर तिनं म्हटलं की, 'माझा प्रिय भारत देश आणि भारतातील जनतेचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच बिनशर्त समर्थन दिलं आहे. पाठिंबा दिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानावरून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मी मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करते.आज मी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला आहे. याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.'