Kadambari jethwani: मुंबई : मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानी हिच्या तक्रारीनंतर आध्र प्रदेशातील 3 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, बॉलिवूडसह सिनेसृष्टीत आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण, आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना कादंबरी जेठवानी (Actress) यांच्या तक्रारीनंतर निलंबित केले आहे. एका प्रकरणात पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी योग्य तपास न करता कादंबरी जेठवानीला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप होता. त्यामुळे, आता कादंबरी जेठवानी अभिनेत्री कोण आहे, तिचं सिनेसृष्टीतील योगदान काय, याशिवाय तिच्या करिअरबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. कादंबरी ही मॉडेल अभिनेत्री असून तिचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरातील आहे.
IMDb वर उपलब्ध असलेल्या प्रोफाइलनुसार, अभिनेत्री कांदबरी जेठवानी ही 28 वर्षांची आहे. ती मॉडेलिंग आणि अभिनय करते. तिचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद येथील एका हिंदू सिंधी जेठवानी कुटुंबात झाला. तिचे वडील नरेंद्र कुमार मर्चंट नेवी ऑफिसर आहेत. तर तिची आई आशा यांना इकोनॉमिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्या भारतीय रिजर्व बँकमध्ये मॅनेजर पदावर काम करतात. कांदबरीचं शिक्षण प्रकाश हायर सेकेंडरी स्कूल, माउंट कार्मेल हायस्कूल आणि उदगम स्कूर अहमदाबाद येथे झालं आहे. तिने 2015 मध्ये फेमिना मिस गुजरात स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे. कादंबरी जेठवानी हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसेच मॉडेलिंग मोहिमांमध्येही काम केले आहे.
काय आहे प्रकरण
कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस.व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. त्यात, वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, असे म्हटले होते. "विद्यासागर यांच्यासह उच्चपदस्त पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या पालकांचा छळ केला. मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी माझा अपमान केला आणि बेकायदेशीरपणे मला आणि माझ्या वृद्ध पालकांना ताब्यात घेतले आणि कुटुंबाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले," असा आरोप कादंबरी जेठवानी यांनी महासंचालकांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.
या तीन अधिकाऱ्यांना केलंय निलंबित
आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांचा समावेश आहे. तपासाअंती या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी