Jio Server Down Update News : आज देशभरात अनंत चतुर्दशीचा उत्सव जोरदार साजरा केला जात आहे. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे.
जिओ मोबाईलचे नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. जिओच्या नेटवर्कवरुन कॉल, मेसेज कोणत्याही प्रकारची सेवा सुरु नाही. याशिवाय, जिओचे इंटरनेटही डाऊन झाले आहे. त्यामुळे जिओचे युजर्स अडचणीत सापडले आहेत. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
मुंबईत राहणाऱ्या अनेक वापरकर्त्यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फोनचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत, ज्यांना कॉल किंवा मेसेज करता येत नाही. जिओचे नेटवर्क डाऊन का झाले? यांची कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. पण लोकांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्समध्ये मोबाईल फोनमध्ये नेटवर्क येत असल्याचे दिसून येते आहे. जिओचे सर्व्हर डाउन झाल्यानंतर काही लोकांनी रिलायन्स जिओ कंपनीचे मालक आणि भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
जिओच्या मोबाईल नेटवर्क सोबत, यूजर्सना जिओचा ब्रॉडबँड सर्व्हर म्हणजेच Jio Fiber वापरण्यात देखील समस्या येत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी ही माहिती दिली आहे की ते अचानक Jio Fiber सेवा वापरू शकत नाहीत.
हे वृत्त लिहिपर्यंत रिलायन्स जिओने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आता यासंदर्भात जिओकडून काय विधान येते आणि जिओ वापरकर्त्यांची ही समस्या कधी संपणार हे पाहावे लागेल.
हे ही वाचा -
पैसे कमवण्याची पुन्हा मोठी संधी! बड्या कंपनीचा तब्बल 7000 कोटींचा तगडा आयपीओ येणार