Jui Gadkari : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस ही मालिका आणि या मालिकेतील सून म्हणजेच सायलीही पसंतीस पडत आहे. सायलीची भूमिका ही अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) साकारत आहे. प्रत्येक संकटावर मात करत सायली तिचा संसार कसा सांभाळते असा सर्वसाधारण मालिकेचा आशय आहे. या मालिकेत अभिनेत्री केतकी विलास (Ketaki Vilas) ही खलनायिकेच्या भूमिकेत असून ती साक्षी शिखरे हे पात्र साकारत आहे.
सध्या ही मालिका बरीच रंजक वळणावर आहे. त्यातच आता जुई गडकरीच्या एका पोस्टनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जुईने तिच्या सोशल मीडियावरुन साक्षीची एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती रडताना दिसत आहे. पण ही एक मेजशीर पोस्ट असून त्याचा मालिकेशी कोणताही संबंध नाही. पण यावर जुईने लिहिलेल्या कॅप्शनमुळे मात्र त्याचा मालिकेशी संबंध जोडला गेला आणि तिच्या चाहत्यांना आनंद झाला.
जुईची पोस्ट नेमकी काय?
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केतकीचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये केतकी एक इमोशनल सिनेमा पाहाताना रडत आहे. यावर जुईने कॅप्शन लिहिलं आहे की, ऑनस्क्रिन सायलीला रडवणारी साक्षी ऑफस्क्रिन इमोशनल फिल्म बघून अशी रडते. सायलीच्या या पोस्टची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा सुरु असल्याचंही पाहायला मिळतंय.
ठरलं तर मग मालिकेत रंजक वळण
सध्या ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणार आहे. कारण अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता संपलं असून त्यांच्या नात्याचं पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे महिपतविरोधातही सायली आणि अर्जुनला महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. तसेच वात्सल्य आश्रम केससंदर्भातही कुठला सुगावा लागणार याचीही उत्सुकता सध्या प्रेक्षकांना आहे.