Johnny depp : हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आणि अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर हे यश जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, त्याने त्याच्या विजयात आणि वाईट काळात साथ दिल्याबद्दल, सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आधी टिकटॉक आणि नंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओ काही वेळांतच लाखो व्हूज मिळाले आहेत.


पाहा पोस्ट :



एम्बरने केली टीका


सध्या जॉनी डेपच्या या व्हायरल पोस्टनंतर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डने (Amber Heard) प्रतिक्रिया म्हणून एक वक्तव्य जारी केले आहे. यात एम्बर हर्डने न्यायालयाच्या निर्णयावर आणि जॉनी डेपच्या दाव्यावर टीका केली आणि म्हणाली, तो त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे.


एम्बर हर्डने तिच्या प्रवक्त्यामार्फत सांगितले की, जॉनी डेप आपल्या आयुष्यात पुढे जात आहे आणि महिलांचे हक्क मात्र मागे जात आहेत. एम्बर हर्ड म्हणते की, तिच्या खटल्याचा निकाल म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्यांना आवाज उठवण्यापासून रोखण्यासारखा आहे.


जॉनी डेपने जिंकला खटला!


हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यावर आता अखेर हा निकाल देण्यात आला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.


जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले.


सहा आठवडे चालला खटला!


जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार साक्ष देत होते. साक्ष आणि वादविवाद अनेक तास सुरु होते. ज्युरीच्या सात सदस्यांनीही तासनतास चर्चा केली आणि त्यानंतर ज्युरी निर्णयावर पोहोचले.


हेही वाचा :