Actor Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : इतिहासाला अनेक पैलू आहेत, हे वक्तव्य आपण थोरामोठ्यांकडून अनेकदा ऐकतो. अशातच याच इतिहासाचे काही प्रसंग, काही घटना अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. प्रसंगी या घटनांवरुन अनेकदा वादही होतात आणि हे वाद विकोपाला जातात. सध्या इतिहासातील अशाच एका घटनेवरुन चर्चांना उधाण आलं आहे. ती ऐतिहासिक घटना म्हणजे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबानं नजरकैदेत ठेवल्यानंतर त्यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग. याच ऐतिहासिक घटनेबाबत एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्यानं खळबळजनक दावा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबानं नजरकैदेत ठेवलेल्या आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर केलेला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले होते, असा दावा ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. सोलापूरकरांच्या याच दाव्याला आता जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ट्वीटमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी  ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टिका केली आहे.


ट्वीटमध्ये काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड? 


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय..."


जितेंद्र आव्हाडांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर आगपाखड करत त्यांच्यावर खळबळजनक आरोपही केला आहे. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे."






"शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल", असं आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 


दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आणि ऐतिहासिक घटनांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांना जाबही विचारला आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनलला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना राहुल सोलापूरकर म्हणाले होते की, "पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो..."