Jaya Prada Jail : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. चेन्नई मधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या चित्रपटगृहात काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.


अभिनेत्री जया प्रदा यांनी चित्रपटातील कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता मात्र अभिनेत्री जया प्रदा आणि त्यांच्यासह इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


जया प्रदा होत्या खासदार


जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने लोकसभेत दोनदा रामपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरची जागा जिंकली होती. नंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


जया प्रदा यांची राजकीय कारकिर्द


जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द 1994 मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरू झाली. जयाप्रदा 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.


1979  मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम या चित्रपटामधून  जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा त्यांना हिंदी भाषा येत नव्हती पण 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या कामचोर या चित्रपटामध्ये त्यांनी हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला. मवाली, तोहफा, आखिरी रास्ता, औलाद, घर-घर की कहानी, मैं तेरा दुश्मन, ऐलान-ए-जंग, जादुगर आणि आज का अर्जुन या जया प्रदा यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 


 


इतर महत्वाच्या बातम्या