Jaani : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि गीतकार जानीनं (Jaani) पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. जानीचं असं मत आहे की, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत, असंही त्याचं मत आहे. जानीनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. जानीनं पत्रात लिहिलं की, त्यानं आधीच आपले कुटुंब परदेशात शिफ्ट केले आहे आणि त्याच्या मॅनेजरच्या जीवाला देखील धोका आहे. 


 जानीच्या मॅमेजरनं म्हणजेच दिलराजनं एबीपी न्यूजला या संदर्भात माहिती दिली. त्यानं सांगितलं की, पंजाब पोलिसांकडे त्याच्या आणि जानीच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. जानीच्या वतीने सीएम भगवंत मान आणि मोहाली एसएसपी यांना हे पत्र लिहिले आहे.


जानीनं पत्रात काय लिहिलं?
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये जानीनं लिहिलं आहे की, गेल्या काही वर्षांपासून तो पंजाबी फिल्म इंडस्ट्री आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.  त्याला आणि दिलराज सिंह नंदाला फोन करुन  गुंड आणि समाजकंटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांमुळे जानीनं त्याच्या कुटुंबाला परदेशात शिफ्ट केले आहे. 


पत्रामध्ये सिद्धू मुसेवालाचा उल्लेख
पत्रामध्ये जानीनं सिद्धू मुसेवालाचा देखील उल्लेख केला आहे. तसेच त्यानं पत्रात लिहिलं आहे की, 'मला शुटिंगसाठी अनेकवेळा प्रवास करावा लागतो. मला जीवे मारण्याची धमक्या मिळत असल्यानं मला बाहेर पडता येत नाही. ' 


कोण आहे जानी? 
जानीनं अनेक पंजाबी आणि हिंदी गाणी लिहिली आणि गायली आहेत. 'पछताओगे' आणि 'बारिश की जाए' यांसारख्या गाण्यांमुळे जानीला विशेष लोकप्रियता मिळाली. क्या बात है, कोका आणि डु यू नो या जानीच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2013 मधील सुपरहिट 'सोच' हे गाणं देखील जानी यांनीच लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी जानीच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली होती. 


हेही वाचा:


Jaani Accident: 'पछताओगे' फेम प्रसिद्ध पंजाबी गायक-गीतकार जानी यांच्या गाडीचा भीषण अपघात, पोस्ट लिहिती दिली माहिती!