मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood ) हा रुपेरी पडद्यावर 'हिरो' म्हणून ओळखला जातोच. पण, खऱ्याखुऱ्या जीवनातही आता त्याची हीच ओळख प्रस्थापित झाली आहे. यामागची कारणंही तशीच आहेत. लॉकडाऊन काळात अभिनेता सोनू सूद यानं अनेक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात मोलाचा हातभार लावला. इतकंच नव्हे तर वेळोवेळी गरजूंच्या मदतीसाठी त्यांनं सढळ हस्ते मदतही केली होती. त्यामुळं कोणासाठी तो देव आहे तर, कोणासाठी खराखुरा सुपरहिरो. अशा या अभिनेत्यावर आता चाहते वेगळीच जबाबदारी सोपवू पाहत आहेत.


सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण, तिथं संघाची कामगिरी काही क्रीडारसिकांच्या मनाजोगी होताना दिसत नाहीय. त्यामुळं चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. याच वातावरणात, आता सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांवर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ज्यामध्ये चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मदतीसाठी थेट सोनूलाच साद घातली आहे. त्यावर चक्क सोनूनंही उत्तर दिलं आहे.


एका नेटकरी/ चाहत्यानं सोशल मीडियावर सोनूला उद्देशून एक प्रश्न करत विचारलं, 'प्रिय सोनू सूद, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात अडकला आहे. तुम्ही त्यांना यातून बाहेर काढू शकता का?'. हा प्रश्न विचारताच सोनूनंही त्याच्याच शैलीत याचं उत्तर दिलं. भारतीय संघाला आणखी एक संधी द्या. पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघालाच घरी आणू, असं त्यानं लिहिलं.


कामगारांच्या मदतीला आलास, आता भारतीय खेळाडूंची मदत कर....


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदनं सर्वस्व पणाला लावत या मजुर आणि गरजुंना मदतीचा हात दिला होता. मुख्य म्हणजे तो या कार्याल स्वत: सहभागी झाला होता. सोशल मीडिया किंवा मग प्रत्यक्ष मार्गानं अनेकांशी संपर्कही साधत होता. त्याची हीच वृत्ती पाहून आता या अभिनेत्यानं भारतीय क्रिकेटपटूंनाही मदत करावी अशा काहीशा विनोदी अंदाजात नेटकऱ्यानं सोनूच्या कार्याला दाद देत संघावर उपरोधिक निशाणा साधला.





विराट सेनेची पडझड


एडिलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संधानं निराशाजनक कामगिरी केली. दुसऱ्या डावात संघ अवघ्या 36 धावांवर गारद झाला. संघातील कोणताच खेळाडू 10 पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. भारतीय क्रिकेट संघाची कसोटी सामन्यातील ही सर्वाच खराब कामगिरी ठरली.