Coldwave देशात मागील बऱ्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आल्याचं लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळं इथं महाराष्ट्रही गारठला आहे.
गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. परभणीमध्ये 5.6 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सध्यापर्यंत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधित निचांकी आकडा दर्शवत आहे. यासोबतच बुलढाण्यातही तापमानाचाप पारा 9 अंशांवर पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर आलं आहे. त्यामुळं या कडाक्याच्या थंडीमुळं आता अनेक भागांमध्ये चौक आणि गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर शेकोट्याही दिसू लागल्या आहेत.
परभणीत हुडहुडी
परभणीमध्ये तापमान अतिशय वेगानं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 7 अंशांवरील तापमानाचा पारा हा अवघ्या दोन दिवसांत 5 अंशांवर आला आहे. त्यामुळं आता रस्त्यावर दिसणारी गर्दीही काहीशी कमी दिसू लागली आहे. गहू आणि हरभरा या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त आहे. त्यामुळं येत्या काळातील हा गारवा पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
मुंबई आणखी गारठणार...
दरम्यान, उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे गारठला असून आता देश आणि राज्यातील थंडीच्या या लाटेचे परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे मुंबईतील तापमान आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा आनंद घेता येत आहे.
मुंबईतील ही गुलाबी थंडी इतरत्र भागांमध्ये मात्र आता बोचरं रुप घेत आहे. त्यामुळं कोरोनाचा धोका पाहता थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.