Housefull 5 Actor Nana Patekar: सध्या थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल 5' (Housefull 5) धुमाकूळ घालतोय. या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. नाना पाटेकरांची वेगळी आणि हटके भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी, 'कौन बनेगा करोडपती 17' या रिअॅलिटी शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते हॉट सीटवरही बसले होते. अशातच यावेळी त्यांनी बिग बींसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच, यावेळी बोलताना नाना पाटेकरांनी त्यांच्या आयुष्यातलं कुणालाच माहीत नसलेलं गुपित उलगडलं.
अमिताभ बच्चन यांचा प्रश्न आणि नाना पाटेकर यांचं साधंसुधं उत्तर
'कौन बनेगा करोडपती 17'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकर यांना एक प्रश्न विचारला, "तुम्ही आयुष्यात इतकं काही मिळवलं, मग तुम्ही सर्व काही सोडून गावी का गेलात?" या प्रश्नाचं उत्तर देताना, नाना पाटेकरांनी त्यांच्या मनातील भावना शेअर केल्या. नाना पाटेकर यांनी बिग बींना उत्तर दिलं की, "मी चित्रपटसृष्टीचा नाही. मी फक्त काम करण्यासाठी इथे येतो आणि नंतर परत जातो. मी कधीही कोणत्याही पार्टीत गेलो नाही, किंवा मी शहरात जास्त काळ राहिलेलो नाही. मी गावातला आहे आणि मला तिथेच राहायला आवडतं. मला तिथलं जीवन आवडतं."
मला माझ्या आईनं खूप काही दिलं... : नाना पाटेकर
नाना पाटेकर शोमध्ये बोलताना काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नाना पाटेकर म्हणाले की, "माझ्या आईकडून मला जे हवं होतं, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त मिळालं. गरजा मर्यादित करणं खूप सोपं आहे. माझ्याकडे एसी नाही, कारण मला त्याची गरज वाटत नाही. ज्याप्रमाणे शहराभोवती भिंती आहेत, तसेच माझ्या घराभोवती डोंगर आहेत. माझं घर डोंगरांनी वेढलेलं आहे आणि मी तिथे आरामात राहतो. मला ते खूप आवडतं..."
नाना पाटेकरांकडून माधुरी दीक्षितवर कौतुकाचा वर्षाव
'वजूद' चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न 'कौन बनेगा करोडपती 17'मधल्या एका प्रेक्षकानं नानांना विचारला. यावर बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, "माधुरी दीक्षितसोबत काम करण्याचा अनुभव अद्भुत होता. ती एक उत्तम अभिनेत्री, सुंदर, अद्भुत नृत्यांगना आहे आणि तिच्याकडे प्रत्येक माणसाकडे असायला हवं असं सर्व काही आहे. मी तिच्याकडे खूप आदरानं पाहतो."
शोमध्ये नंतर प्रेक्षकांनी नाना पाटेकर यांना 'वजुद' चित्रपटात माधुरी दीक्षितसाठी म्हटलेल्या 'कैसे बताउँ मैं तुम्हें' या कवितेबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर हसत हसत नाना पाटेकरांनी उत्तर दिलं, "ती कविता जावेद अख्तर साहेबांनी लिहिली होती. तो चित्रपट बनून जवळजवळ 30-35 वर्ष झालीत, पण मला अजूनही ही कविता आठवते. मी ही कविता माधुरीसाठी म्हटलेली, त्यामुळे ती विसरणं माझ्यासाठी कठीण आहे. आजही असं वाटतं की, ती कविता माझ्या रक्तात वाहतेय. जेव्हा जेव्हा कोणी मला त्या कवितेबद्दल विचारतं, तेव्हा माझ्या हृदयात अनेक आठवणी ताज्या होतात." दरम्यान, नाना पाटेकर अभिनेता उत्कर्ष शर्मा, अभिनेत्री सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबत शोमध्ये आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :