Akshay Kumar Breaks Silence On Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3'मधून अभिनेते परेश रावल यांनी अचनाक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि हा चर्चेचा विषय ठरला. पुढे परेश रावल यांच्या निर्णयामुळे मोठा वादही निर्माण झालेला. अभिनेत्याच्या या निर्णयानं निर्माते आणि कलाकारांसह अनेकांना धक्का बसला. या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, अक्षय कुमारची कंपनी केप ऑफ गुड सिनेमानं परेश रावल यांच्याविरुद्ध 25 कोटींचा दावा दाखल केला. त्यावेळी मात्र, या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळालं. त्यानंतर बरंच काही घडलं, चाहत्यांनी परेश रावल यांनी मनधरणी केली. त्यासोबत 'हेरा फेरी'मधल्या सहकलाकारांनीही परेश रावल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच उपयोग झाला नाही, परेश रावल आपल्या निर्णयावर ठाम होते. पण, अशातच आता अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील वाद मिटला असून दोघांमध्ये समेट झाला आहे. तसेच, 'हेरा फेरी 3' बद्दल बोलताना आता सर्व काही ठीक होईल, अशी हिंट खुद्द खिलाडी कुमार अक्षय कुमारनं दिली आहे.
'हेरा फेरी 3' बद्दल बोलताना अक्षय कुमार काय म्हणाला?
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'हेरा फेरी 3' स्टार अक्षय कुमारला चित्रपटाच्या अलिकडील अपडेट्स आणि त्याबद्दलच्या अधिक तपशीलांबद्दल विचारण्यात आले. प्रश्नाचं उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, "जे काही घडतंय, ते तुमच्या समोर घडतंय. मी फिंगर्स क्रॉस करुन तुम्हाला सांगतोय, मला आशा आहे की, सर्व काही ठीक होईल." अक्षयनं सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिलं आणि म्हणाला, "सर्व काही ठीक होईल. मला हे निश्चितपणे माहीत आहे."
अक्षय कुमारनं दिलेल्या आश्वासनानंतर आता फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैय्या दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यापासून अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील सुरू असलेला वाद चर्चेत आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी 'हेरा फेरी'मधील भूमिका गळ्यातील फास असल्याचं म्हटलेलं आणि म्हटलेलं की, ते टाईपकास्ट झाले आहेत आणि तिथून आता त्यांना पुढे जाण्याची इच्छा आहे.
अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील वाढता तणाव
परेश रावल यांनी माघार घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अक्षय कुमारनं परेश रावल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. प्रत्युत्तरात परेश रावल यांनी सिनेमासाठी घेतलेली सायनिंग अमाउंट परत केली, ज्यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढला. सुरू असलेल्या वादानंतरही, अक्षय आणि परेश दोघांनीही अलिकडेच प्रियदर्शनच्या हॉरर-कॉमेडी 'भूत बांगला'चं शूटिंग पूर्ण केलं आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट 'कन्नप्पा'
कामाच्या बाबतीत, अक्षय कुमार 'कन्नप्पा' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत एक भव्य पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो भगवान शिवाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात विष्णु मांचू मुख्य भूमिकेत आहे, तर अक्षय मोहनलाल आणि प्रभाससोबत एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. 'कन्नप्पा' हा चित्रपट 27 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अक्षयचा तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणारा आहे.