Puneeth Rajkumar : दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांना म्हैसूर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (मरणोत्तर) प्रदान करण्याचे जाहीर केले आहे. म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हेमंत कुमार यांनी रविवारी ही घोषणा केली. सिनेविश्वातील त्यांच्या योगदानासाठी आणि परोपकारी कार्यासाठी त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या संदर्भात विद्यापीठाने पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनी यांच्याशी संपर्क साधला. 22 मार्च रोजी होणाऱ्या 102व्या दीक्षांत समारंभात पुनीत यांच्या वतीने डॉक्टरेट स्वीकारण्यास त्यांच्या पत्नीने सहमती दर्शवली आहे. पुनीत यांचे गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पुनीतचे वडील दिवंगत डॉ. राजकुमार यांनाही म्हैसूर विद्यापीठाने मानद पदवी बहाल केली होती.


म्हैसूर विद्यापीठ 22 मार्च रोजी 102वा दीक्षांत समारंभ साजरा करणार आहे. या सोहळ्यात 28,581 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला होता. कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाला उशीर झाला होता.


हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन


पुनीत यांचे वय अवघे 46 वर्षे होते आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. फिटनेस फ्रीक म्हणवल्या जाणाऱ्या पुनीत यांना जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याची समस्या जाणवली. पुनीतची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तसे होऊ शकले नाही.


अभिनेत्याचे समाजकार्य


पुनीत म्हैसूर येथील शक्तीधाम आश्रमात त्यांच्या आईसोबत अनेकवर्ष सेवा करत होते. खऱ्या आयुष्यातही ते अगदी ‘हिरो’ होते. पुनीत जवळपास 26 अनाथाश्रम, 15 मोफत शाळा, 16 वृद्धाश्रम, 19 गोठ्यांमध्ये दानधर्म आणि मदतकार्य करत होते. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी हे सर्व शांतपणे केले. मृत्यूनंतर त्यांचे डोळे दान करण्यात आले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha