Social Media : सोशल मीडियावर (Social Media) 31 ऑगस्ट रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे पुरोगामी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आपल्या लेकीच्या भेटीसाठी जाणाऱ्या एका वृद्ध माणसाला बीफ घेऊन जात असल्याच्या संशयावरुन रेल्वेत तरुणांनी मारहाण केली. या घटनेवर अनेकांनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून रोष व्यक्त केला. त्याचप्रमाणे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई देखील मागणी होऊ लागली. या सगळ्यावर अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांनी देखील पोस्ट करत घटनेचा निषेध केला होता.
या सगळ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दोषींवर कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कोणत्याही घटनांना थारा मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं. ज्या महाराष्ट्रात जातीयवाद नाही, त्याच महाराष्ट्रात अशा घटना किती लज्जास्पद आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया उमटत आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट काय?
हेमंत ढोमेने सुरुवातीला हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं होतं की, नका रे नका… आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका! विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र! आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाहीय… कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये अजित पवारांना टॅग करत तुम्ही तरी कठोर कारवाई कराल बाकी लोकांकडून अशा अपेक्षा नाहीत, असं म्हटलं होतं.
त्यानंतर अजित पवारांकडून दोषींवर कारवाई करण्यात आल्याचं ट्विट करण्यात आलं. ते ट्विट हेमंतने पुन्हा शेअर करत म्हटलं की, खूप खूप धन्यवाद दादा! आम्हाला खात्री आहे आपण स्वतः लक्ष घालून अपराध्यांना कठोर शिक्षा मिळवून द्याल! जेणेकरून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं वागण्याची कोणाची पुन्हा हिंमत होणार नाही! आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!
पूजा भट्टनेही केली कारवाईची मागणी
दरम्यान अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे. पूजाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. आपल्या गौरवशाली महाराष्ट्रात जातीयवाद नाही, याचा आपल्याला अभिमान आहे. यावर कारवाई झालीच पाहिजे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईहून धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये 28 ऑगस्टला हा प्रकार घडला. जळगावमध्ये राहणारा वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी जायला निघाला होता. नाशिक रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून तरूणांशी वाद झाला. या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला, त्याचवेळी त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरूणांनी वृद्धाला मारहाण केली. यावेळी काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ शेअर केला आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले.
तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे हे तिघेजण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवेंच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं. हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे असून 28 ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते. आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत. अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळ्याचे आहेत. त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.