Hemant Dhome on Sanjay Gaikwad : सध्या राज्यात सुरु असलेल्या अनेक घडामोडींवर सिनेसृष्टीतले कलाकारही अनेकदा व्यक्त होतात. सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून हे कलाकार त्यांची मत परखडपणे मांडत असल्याचं पाहायला मिळतं. राज्यात एका आमदाराच्या मुद्द्यावरुन अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेची (Hemant Dhome) पोस्ट चर्चेत आलीये. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वाघाच्या शिकारीचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राजकीय वर्तुळातून देखील त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जातेय.
हेमंत ढोमेने ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट करत संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. तसेच त्याने या पोस्टमध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांना देखील टॅग केले आहे. अशा लोकप्रतिनिधींवर योग्य ती कारवाई करावी अशी थेट मागणी हेमंतने त्याच्या पोस्टच्या माध्यमातून केलीये.
तर आपलं कठीण आहे - हेमंत ढोमे
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर हेमंत ढोमेने म्हटलं की, या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती!आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय! हेमंतच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
संजय गायकवाड यांनी काय म्हटलं होतं?
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर संजय गायकवाड यांना त्यांच्या गळ्यातील लॉकेट संदर्भात विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी म्हटलं की, हा दात वाघाचा आहे. मी स्वत: 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती. तोच दात आपण लॉकेटमध्ये घातला असल्याचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं.
राज्यातील प्रश्नांवर कलाकरांची परखड मतं
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच लांबला आहे. त्यावर देखील मराठी कलाकरांनी त्यांची मतं व्यक्त केली होती. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला देखील अनेक पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं.