Sharman Joshi Birthday : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) आज (28 एप्रिल) आपला 43वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 एप्रिल 1979मध्ये शर्मन जोशीचा जन्म मुंबईत झाला. शर्मनचे वडील गुजराती रंगभूमीचे कलाकार असल्याने, अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं होतं. निरागस चेहरा आणि विनोदी शैली या आपल्या कौशल्यांनी शर्मनने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. शर्मनचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात कार्यरत आहे.
‘गॉडमदर’ या 1999मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटातून शर्मनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर शर्मनने अनेक सुपर हिट हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. यातील ‘गोलमाल’, ‘थ्री इडियट्स’ सारख्या चित्रपटांनी अभिनेत्याच्या करिअरला एक वेगळी उंची दिली. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या अशा काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल...
थ्री इडियट्स
लेखक चेतन भगत यांच्या ‘थ्री इडियट्स’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी तयार केला होता. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, करीना कपूर, बोमन इराणी आणि शर्मन जोशी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटात शर्मनने साकारलेलं ‘राजू’ हे पात्र चाहत्यांना आणि प्रेक्षकांना भरपूर आवडलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता.
रंग दे बंसती
‘रंग दे बसंती’ हा बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. या चित्रपटातही आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी झळकले होते. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा सशक्त अभिनय प्रेक्षकांना भावला होता.
गोलमाल
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गोलमाल’. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. या चित्रपटात शर्मन जोशीसह, अजय देवगण, तुषार कपूर आणि अरशद वारसी हे कलाकार झळकले होते.
लाईफ इन अ मेट्रो
मुंबईत राहणाऱ्या आणि स्वत:च्या संघर्षाला सामोरे जाणाऱ्या काही पात्रांच्या गुंफलेल्या कथा ‘लाईफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. या चित्रपटात एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या आणि आपल्या प्रेमाची कबुली देण्यास खूप लाजणाऱ्या अशा मुलाची भूमिका साकारली होती.
स्टाईल
2001मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्टाईल’ हा चित्रपट आजही तितक्याच उत्सुकतेने पाहिला जातो. या चित्रपटात शर्मन जोशी आणि साहिल खान ही जोडी झळकली होती. शर्मन आणि साहिलची जोधी त्यांच्या महाविद्यालयातील सर्वात खोडकर जोडींपैकी एक होती. सतत धमाल करण्याच्या नादात दोघेही गुंडांसोबत वादात अडकतात आणि नंतर त्यातून सुटतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.
हेही वाचा :