Emraan Hashmi Birthday : बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यावर्षी त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘फुटपाथ’ या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर 2004मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून इमरान हाश्मीला एक वेगळी ओळख मिळाली. ‘राज 3’, ‘मर्डर’, ‘कलयुग’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवून, आपण कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा सहजतेने साकारू शकतो, हे इमरानने सिद्ध केले आहे.
इमरान हाश्मीचा जन्म 24 मार्च 1979 रोजी मुंबईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव अन्वर हाश्मी आणि आईचे नाव माहिरा हाश्मी आहे. इमरान हाश्मीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘शांघाय’ यांसारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला तीनदा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे.
‘या’ चित्रपटाने मिळवून दिली ओळख!
इमरान हाश्मीने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे 40हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फूटपाथ’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. पण, या चित्रपटात इमरान आफताब शिवदासानीसोबत सहाय्यक भूमिकेत दिसला होता. त्याच वेळी, त्याला 2004च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मर्डर’ने बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. 2005 साली आलेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
‘सिरीयल किसर’ची ओळख!
या चित्रपटांनंतर इम्रानने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आज तो बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. इमरानचा असा एकही चित्रपट नाही, ज्यात त्याने सहअभिनेत्रीला किस केले नसेल. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये 'सिरियल किसर' म्हणून ओळखले जाते. वास्तविक, 2012 मध्ये आलेल्या 'राझ 3' चित्रपटात इमरान हाश्मीने अभिनेत्री बिपाशा बसूला सर्वात लाँग किस केले होते. हे चुंबन दृश्य 20 मिनिटांचे होते, जे बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे चुंबन आहे, तेव्हापासून त्याला 'सिरियल किसर' म्हणून ओळख मिळाली होती.
किसिंग सीन पाहून पत्नी रागवायची!
एका मुलाखतीदरम्यान इमरानने सांगितले होते की, त्याची पत्नी परवीन साहनी हिला त्याचे किसिंग सीन देणे अजिबात आवडत नव्हते. त्याला इतर अभिनेत्रींना किस करताना पाहून तिला राग यायचा. इमरानने आणखी मजेशीरपणे खुलासा केला की, 'आता ती मला किसिंग सीनवर तितकीशी मारत नाही, पूर्वी ती मला थेट बॅगने मारायची.’ इमरान हाश्मी आणि परवीन साहनी यांनी 2006 मध्ये लग्न केले होते. त्यांना अयान हाश्मी नावाचा एक मुलगा देखील आहे.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha