Gulhar : ज्या गाण्याची झलक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांच्या कानांना सुरेल संगीताची अनुभूती देत होतं ते आता प्रत्यक्ष भेटीला आलं आहे. 'गुल्हर'चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र ज्या गाण्याची चर्चा होती, ते गाणं संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. प्रदर्शनापूर्वीच 'गुल्हर'मधील 'लहर आली, लहर आली गं...' या गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. आता हे संपूर्ण गाणं व्हिडीओसह रिलीज करण्यात आलं आहे. आॅडीओप्रमाणेच या गाण्याचा व्हिडीओही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे. सुमधूर संगीत आणि आवाजाच्या जोडीला 'लहर'मधली नवी कोरी जोडीही प्रेक्षकांना भावत आहे. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी 'गुल्हर'ची निर्मिती केली आहे. 'गुल्हर'च्या दिग्दर्शनासोबतच रमेश चौधरी यांनी यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. 'लागीरं झालं जी' मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे. या दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं 'लहर आली, लहर आली गं...' हे गाणं 'गुल्हर'मधील दोघांच्या प्रेमकथेत गुलाबी रंग भरण्याचं काम करणारं आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा जरी एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली तरी त्यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी आणि पद्मनाभ गायकवाड यांनी लिहिलं असून, पद्मनाभनंच अजय गोगावले आणि अपूर्वा निशादच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. रिलीज करण्यात आलेलं या गाण्याचं लक्षवेधी पोस्टर उत्सुकता वाढवणारं आहे. पावसात भिजणारी शिवानी-रमेश ही जोडी या पोस्टरवर आहे.
6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या 'गुल्हर'वर देश-विदेशातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या बऱ्याच पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखनासोबतच तांत्रिक विभागातील कामाचंही कौतुक झालं आहे. मोहन पडवळ यांनी 'गुल्हर'ची कथा लिहिली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. शिवानी-रमेश या जोडीसोबत या चित्रपटात रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी अभिनय केला आहे. उत्तम डिओपी आणि संकलक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार डोंगरे यांनी सिनेमॅटोग्राफीसोबतच संकलनही केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत, विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन, तर निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. योगेश दीक्षित यांनी डिआयचं काम पाहिलं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत.
हेही वाचा :