Lady Gaga : अकॅडमी, अर्थात ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारांवर आपलं नाव कोरत साऱ्या जगातील कलाविश्वात लेडी गागा ही गायिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. नुकतीच तिनं ओप्रा विंफ्रे यांच्या शोवर हजेरी लावली होती. तिथं तिनं बऱ्याच गोष्टींवर खुलेपणानं भाष्य केलं. जीवनातील एका अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळाबाबतही तिनं यावेळी गौप्यस्फोट केला. फार लहान वयातच लेडी गागावर अत्याचार झाले होते. लैंगिक शोषण झाल्याची ती धक्कादायक घटना ती आजही विसरु शकलेली नाही. 


वयाच्या 19 व्या वर्षी झालेला बलात्कार 
कार्यक्रमात लेडी गागानं सांगितलं, 'मी 19 व्या वर्षापासूनच काम सुरु केलं होतं. त्याचवेळी माझी ओळख एका संगीत दिग्दर्शकासोबत झाली. त्यानं माझ्यावर अत्याचार केले, माझं लैंगिक शोषण झालं. यानंतर मी गरोदर झाले होते'. या घटनेमुळं आपण आजारपणात लोटलो गेल्याचंही तिनं सांगितलं. सुरुवातीला आपल्याला वाईट वाटलं आणि मग मन सुन्न झालं. अनेक आठवडे झाले मी आजारी होते. त्यावेळी मला जाणवलं की या वेदना मला त्याच व्यक्तीनं दिल्या होत्या ज्यानं माझ्यावर अत्याचार केले आणि मला या अवस्थेत सोडलं. मला आठवतंय की अनेक महिने मला त्यावेळी स्टुडिओमध्ये बंधिस्त ठेवण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोटही तिनं केला. 


मानसिक आरोग्याबाबत लेडी गागा म्हणते... 
लेडी गागानं यापूर्वीची तिच्या मानसिक आरोग्याबाबत खुलेपणानं वक्यव्य केलं आहे. आपण मानसिक अस्थैर्याचा सामना करत असताना मदतीसाठी मात्र कोणीही नव्हतं अशी खंत तिनं व्यक्त केली होती. यावेळी योग्य उपचार आणि औषधांनीच आपल्याला आधार दिल्याचंही ती म्हणाली होती. 


सध्या लेडी गागा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये? 
सध्याच्या घडीला लेडी गागा, व्यावसायिक मायकल पोलांस्कीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच ती 'House Of Gucci' या क्राईम ड्रामाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.