Marathi Movie : शोध हा कधीच संपत नाही, माणूस नेहमीच कशा ना कशाच्या शोधात असतोच. बरेचदा हे शोध पूर्ण होतात तर काहीवेळा ही गणिते न उलगडणारी असतात. अशातच एका रात्रीतील अनेक गूढ लवकरच मोठया पडद्यावर उलगडण्यास सज्ज होत आहेत. कारण रहस्य उलगडणारा 'गारुड' (Marathi Movie) हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा 'गारुड' या चित्रपटातून समोर येणार आहे.
नुकतीच या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत. काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे 'गारुड' चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि कलाकारांची नावे समोर आल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. 'किमयागार फिल्म्स', 'एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम यांनी बाजू सांभाळली.
हे कलाकार दिसणार सिनेमात
चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे ही कलाकारांची फौज कथेमागील रहस्य गडद करताना दिसणार आहेत. तर तृप्ती राऊत, संतोष आबाळे, उमा नामजोशी, पंडित ढवळे, वैष्णवी जाधव, सार्थक शिंदे हे सहकलाकार चित्रपटात झळकणार आहेत. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित असून रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे.
चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रताप सोनाळे म्हणाले की, "हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं 'गारूड' आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते", असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. 'गारुड' हा रहस्यमय चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.