Elvish Yadav Arrested: बिग बॉस OTT सिजन 2 (Bigg Boss OTT 2) चा विनर आणि युट्युबर एल्विश यादवला (Elvish Yadav) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान त्याच संदर्भात रविवार 17 मार्च रोजी एल्विशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर एल्विशला पुरव्यासह अटक करुन न्यायालयात हजर केले. दरम्यान कोर्टाने आता एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डीसीपी सेंट्रल नोएडा, विद्या सागर मिश्रा यांनी या प्रकरणात माहिती देताना म्हटलं की, हे वन्यजीव संरक्षणाचे प्रकरण आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. यापूर्वी वन्यजीव संरक्षण अंतर्गत तक्रार करण्यात आली होती. तपासानंतर एल्विश यादवविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आलीये. या तपासात पुढे आणखी काही जणांची नावे समोर आल्याच त्यांच्यावरही कारवाी केली जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीपल फॉर ॲनिमल्सने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. यादरम्यान, बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. नोएडाच्या सेक्टर 51 मध्ये एका पार्टीत सापाचे विष पुरवल्याप्रकरणी अल्विशसह आणखी 6 जणांची नावे समोर आली होती. एल्विशला नोएडाच्या सेक्टर 113 मधून अटक करण्यात आली आहे. एल्विश यादववर पार्ट्या आणि क्लबमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप आहे, जो देशात कायदेशीर गुन्हा आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशवर एनडीपीएस कायदाही लागू केल्याचे सांगण्यात येत आहे.
एल्विश यादवला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा
नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध आयपीसी, वन्यजीव संरक्षण कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत एल्विश दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.