Swara Bhaskar on BJP : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवार 17 मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे. राहुल गांधींची ही भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nayay Yatra) मणिपूरपासून सुरु झाली होती. या यात्रेमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता. अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली होती. या यात्रेमधून स्वरा भास्करने भाजपवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीये. 


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्याचीच प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. मागील 63 दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेमधून जनतेशी संवाद साधतायत. त्याचप्रमाणे मुंबईत राहुल गांधींची रविवार 17 मार्च रोजी मुंबईतील मणीभवन ते आझाद मैदानापर्यंत भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली होती. या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्यासह अभिनेत्री स्वरा भास्कर देखील सहभागी झाली होती.


इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आलाय - स्वरा भास्कर


त्यांनी सीएए आधीचं आणलं होतं. आता इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आलाय. त्यामुळे त्या सगळ्या गोष्ट लपवण्यासाठी त्यांनी आता सीएएच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. जनतेची फसवणूक करण्याचंच काम ते गेली 10 वर्ष करतायत. त्यामुळे या सरकारचा हेतू फक्त सत्ता आणि खुर्ची आहे, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही, असं म्हणत स्वरा भास्कर हीने भाजपवर हल्लाबोल केलाय. 


राहुल गांधींना जनतेची 'मन की बात' ऐकायची असते - स्वरा भास्कर


स्वरा भास्करने यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा देखील केलीये. तिने म्हटलं की,राहुल गांधी यांच्या या दोन्ही भारत जोडो यात्रा प्रशंसनीय आहे. कन्याकुमारी ते काश्मीर तसेच मणिपूर ते मुंबई असं देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते जनतेचं ऐकूण घेण्यासाठी चालत होते. आपल्याकडे असे अनेक नेते आहेत, ज्यांना फक्त आपली मन की बात लोकांना ऐकवायची असते. पण मला असं वाटतं की राहुल गांधी यांची ही खासियत आहे की त्यांना लोकांशी संवाद साधायचा असतो. आपल्याला अनेकदा आपल्या नेत्यांकडून पदरी निराशा पडते. पण राहुल गांधी यांच्यामुळे ती निराशा काहीशी दूर होत असल्याचं पाहायला मिळतंय. 






देशात सध्या द्वेषाचं राजकारण - स्वरा भास्कर


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही कोणत्याही प्रकारचा द्वेष पसरवत नाहीये. ही प्रत्येक जाती धर्माची लोकं आहेत. इथे कोण कुठलंय, कोणी काय घातलंय, कोण काय खातंय याने काहीही फरक पडत नाही. आपला देश हा खूप सुंदर होता, आहे आणि कायम राहिल याचा प्रत्येय या भारत जोडो यात्रेतून येतो. इथे कोणत्याही प्रकारच्या द्वेषाला स्थान नाही. कारण सध्या आपल्या देशात द्वेषाचंच राजकारण सुरु आहे. जे खोटं बोलून, आपली दिशाभूल करुन लोकांची फसवणूक करतायत. त्यामुळे राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा अत्यंत महत्त्वाची होती, असं स्वरा भास्कर हिनं म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Hanuman OTT Release: अखेर तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला ओटीटीचा मुहूर्त सापडला, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? जाणून घ्या सविस्तर