मुंबई : बाजीप्रभू देशपांडे यांनी जिथे महापराक्रम गाजवला ती पावनखिंड महाराष्ट्राच्या मनामनांत आहे. पावनखिंडीने घडवलेला इतिहास हा स्वराज्यासठी लाखमोलाचा होता आणि असेल. पण केवळ इतिहासच नाही. तर शेकडो वर्ष उलटूनही पावनखिंड या नावाला असणारी किंमत कैक लाखांची आहे. याचा अनुभव नुकताच आला. सिनेमा तुम्ही तुम्हाला हवा तेव्हा बनवा. पण आधी त्याचं नाव रजिस्टर करून ठेवलं जातं. कारण ते नाव इतर कुणी घेतलं तर गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच काही टायटल्स मुद्दाम रजिस्टर केली जातात. त्यानंतर तिसऱ्याला कुणाला हे टायटल हवं असेल तर तो ते ज्याच्याकडे ते आहे त्याच्याकडून पडेल त्या किमतीला विकत घेतो. असाच एक किस्सा घडला आहे पावनखिंड या नावाचा. 


गेल्या वर्षी दिग्पाल लांजेकर यांनी जंगजौहर या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेल्या घोडखिंडीतल्या पराक्रमावर बेतलेला आहे. हा चित्रपट जाहीर होतो न होतो तोच पावनखिंड या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली. ठरल्यानुसार, जंगजौहर पूर्ण झाला. पावनखिंड या चित्रपटाचं काम चालू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत '..आणि काशीनाथ घाणेकर' दिग्दर्शित अभिजीत देशपांडे. हा चित्रपट बनत असतानाच अचानक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाचं जंगजौहर हे नाव बदलून पावनखिंड करायचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला. पावनखिंड हे नाव यापूर्वी एका चित्रपटाला असलं तरी ते नाव अधिकृतरित्या रजिस्टर तिसऱ्याच माणसानं केलं होतं. त्याला लाखो रुपये देऊन हे टायटल 'जंगजौहर'च्या निर्मात्यांनी आपल्याकडे घेतलं आणि त्यांचा जंगजौहर हा चित्रपट 'पावनखिंड' झाला. सिनेवर्तुळात असलेल्या चर्चेनुसार ही रक्कम काही लाखांत जाते. 


पण बातमी पुढे आहे. जंगजौहरने नाव बदलल्याने पावनखिंड नाव दिलेल्या सिनेमाची गोची झाली. मग ही टीम दुसरी नावं शोधू लागली. त्यानंतर समोर आलेला प्रकार हा चकित करणारा होता. सिनेवर्तुळात असलेल्या चर्चेनुसार, 'जंगजौहर'च्या निर्मात्यांनी एक दोन नव्हे, तर बाजीप्रभूंच्या पराक्रमाशी संबंधित तब्बल 7-8 नावं आपल्या नावे रजिस्टर केली होती. त्यामुळे आता बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरच बनणाऱ्या चित्रपटाला नवं नाव काय द्यावं हा प्रश्न समोर उभा ठाकला.  प्रकारावर उघड उघड कोणीही बोलायला तयार नाही. 


हा प्रकार लक्षात येताच, नावावरून उद्भवलेला हा पेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळासमोर गेला. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दोन्ही पक्षांना समोर बसवलं. दोघांनी आपली बाजू मांडली. याबाबत बोलताना महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "सिनेमाच्या नावावरून पेच तयार झाला होता. आधी एका सिनेमाचं नाव जंगजौहर होतं. त्यांनी रीतसर ते टायटल दुसऱ्याकडून विकत घेऊन आपलं नाव जंगजौहर बदलून पावनखिंड केलं. यात तांत्रिकदृष्ट्या कुठेच चूक नाही. पण अशाने पावनखिंड हे नाव आधीपासून ठरवलेल्या निर्मात्यांसमोर अडचण निर्माण झाली. पण आता त्यावर तोडगा निघाला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाचं नाव पावनखिंड असं असेल तर अभिजीत देशपांडे दिग्दर्शित चित्रपटाचं नाव आता पावनखिंडीची शौर्यगाथा असं असेल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते अजय पूरकर. तर अभिजीत देशपांडे यांच्या चित्रपटात बाजीप्रभू साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. 


महामंडळाने यावर तोडगा काढून वाद मिटवला आहे खरा. पण यामुळे सिनेमाचं असलेलं नाव आणि त्याची अधिकृत नोंदणी किती महत्वाची असते हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :