मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी यातील प्रत्येक कलाकाराला भरभरुन प्रेम दिलं. गुढ कथानक, मालिकेतील पात्र आणि सर्वसामान्यांच्या घराघरात स्थान मिळवणाऱ्या या मालिकेनं अनेक विक्रमच रचले. अशी ही मालिका आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मागील काही दिवसांपासून मालिकेची प्रसिद्धीही करण्यात येत आहे. रहस्यमय कथेकडे खुणावणारे प्रोमो पाहता मालिकेतून यावेळी नेमका कोणता उलगडा होणार अशाच प्रश्नांनी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सुरुवात केली. अशाच या मालिकेतून अण्णा नाईक परतणार अशा चर्चा होत असतानाच ओघाओघानं आणखी एका नावाचीही चर्चा झाली.
ही चर्चा होती, 'शेवंता'च्या नावाची. अभिनेत्री अपूर्वी नेमळेकर हिनं साकारलेलं शेवंता हे पात्रही विशेष गाजलं. नकारात्मक भूमिकेची छटा असतानाही शेवंताला भलतीच लोकप्रियता मिळाली. आता नव्या पर्वात शेवंता असणार ही नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच अपूर्वानं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेवंताचीच पहिली झलक सर्वांच्या भेटीला आणली.
'भेटूयात लवकरच...' असं म्हणत अपूर्वानं नेमळेकर हिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये अपूर्वा म्हणजेच शेवंता सर्वांच्याच नजरा रोखून धरत आहे. कुंकवानं भरलेला मळवच, मोकळे केस आणि एका ठिकाणी रोखलेली तिची भेदक नजर पाहता आता शेवंता या नव्या पर्वात नेमकी कोणत्या वळणावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.