मुंबई : शासनाने प्रयोग करण्यास मान्यता दिल्यानंतर हळूहळू अनेक नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर सादर होऊ लागले आहेत. पुण्यातील नाटक कंपनी लॉकडाऊन नंतर प्रथमच मुंबईत प्रयोग करण्यास येत आहे. नाटक कंपनीच्या 'आयटम' आणि 'महानिर्वाण' अशा दोन नाटकांचे प्रयोग 8 व 9 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा व नऊ वाजता पृथ्वी थिएटरला सादर होणार आहेत. पुण्यातील नाटक कंपनी ही गेली 12 वर्षे सातत्याने प्रायोगिक नाटक करत आहे.
सतीश आळेकर लिखीत आणि दिग्दर्शित 'महानिर्वाण' हे नाटक भारतीय नाट्यसृष्टी मधील एक अद्वितीय कलाकुसरीचा नमुना आहे. गेली 40 वर्ष ह्या नाटकाचे प्रयोग भारतात आणि परदेशात सातत्याने होत आहेत. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग 1974 साली राज्यनाट्य स्पर्धेत झाला आणि तेव्हापासून या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या नाटकाचे 400 हुन अधिक प्रायोगिक तत्वावर प्रयोग झाले आहेत. 10 भाषांमध्ये नाटकाचे भाषांतरदेखील झालेले आहे. या नाटकात कीर्तन हा भारतीय संगीत प्रकार वापरण्यात आला असून नाटक ब्लॅक कॉमेडीच्या ढंगाने भारतीय समाज, नातेसंबंध, माणसाच्या आंतरिक संघर्षावर भाष्य करते. नाटक कंपनीने 3 वर्षापूर्वी हे ऐतिहासिक नाटक पुनरुज्जीवित केले. नाटकाचे दिग्दर्शन स्वतः सतीश आळेकर यांनीच केले. 'महानिर्वाण' भारतीय समाज आणि संस्कृतीचे अवशेष आणि त्याची सोयीनुसार केली जाणारी अंमलबजावणी विनोदी पद्धतीने दर्शवते. नाटक सामाजिक रूढी आणि परंपरांकडे पाहण्याचा नवीन आणि आधुनिक दृष्टीकोन तयार करते. माणसाला 'माणूस' म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ज्यामुळे माणूस घडत असतो, त्या परिस्थितीवर प्रशचिन्ह उपस्थित करते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सतीश आळेकर यांनी केले असून, नाटकात नचिकेत देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, भक्तीप्रसाद देशमाने, मयुरेश्वर काळे, भूषण मेहेरे, निनाद गोरे, वरद साळवेकर, सौरभ शाळीग्राम व इतर नाटक कंपनीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
नाटक कंपनीची दुसरी प्रस्तुती सिद्धेश पूरकर लिखित, क्षितिश दाते दिग्दर्शित 'आयटम' हे नाटक आहे. बहुप्रतिष्ठित अशा मेटा थिएटर फेस्टिव्हल मध्ये जिंकलेले ' आयटम' हे नाटक आहे. नाटक कंपनी कडून जयपूर, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता येथे होणाऱ्या विविध मानाच्या फेस्टिव्हलमध्ये प्रयोग सादर करण्यात आले आहेत. तर मेटा थिएटर फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या नाटकात काम करणाऱ्या साईनाथ गणुवाड या अभिनेत्याने पटकावला आहे. 'आयटम' हा शब्द कानावर पडल्यावर आपल्या भारतीयांच्या मनात पहिले जो विचार येतो त्यावरच हे नाटक भाष्य करते. एरवी हा शब्द नमुना अथवा नग या अर्थाने वापरला जातो परंतु, आपल्या समाजात 'आयटम' हा शब्द मुलीच्या संदर्भातच वापरला जातो. भारतीय सिनेमा सृष्टीत, बी ग्रेड चित्रपट अशी एक कॅटेगरी आहे. त्या चित्रपटामध्ये लाइटिंग विभागात काम करणाऱ्या 'राकेश' या माणसाची कथा 'आयटम' या नाटकात उलगडत जाते. त्याच्या आयुष्यात आलेली 'सपना' ही मुलगी बी ग्रेड चित्रपटामध्ये कशी स्टार होते आणि पुरुषसत्ताक इनडस्ट्रीमध्ये सपनाची काय अवस्था होते, हे या नाटकात उपहासात्मक पद्धतीने दाखवले आहे. नाटकात दीप्ती महादेव, साईनाथ गणुवाड, निनाद गोरे, सिद्धार्थ महाशब्दे, अनुज देशपांडे, रुचिता भुजबळ, यश रुईकर, शुभम जिते यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर नाटक कंपनीचे इतर कलाकार देखील काम करतात.