मुंबई : गोमुत्राचे फायदे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहेत. म्हणूनच धार्मिक कार्यात गोमुत्राचा समावेश होतो. आता थेट अक्षयकुमारनेच गोमुत्र प्राशनाचं महत्व सांगितलं आहे. पण त्याच्या या कमेंटनंतर अक्षयवर टीकेचा भडिमार होतो आहे. गोमुत्राबद्दल कुणाच्याच मनात शंका नाहीय. पण अक्षयची ही टिप्पणी विशिष्ट लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असल्याचं बोललं जातं.
अक्षयकुमारने नुकतंच इन्स्टा लाईव्ह सेशन केलं. त्यात त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्यावेळी त्याची बेल बॉटम या सिनेमाची सहकारी अभिनेत्री हुमा कुरेशीने त्याला हत्तीच्या विष्ठेपासून बनलेला चहा पिण्याचा अनुभव विचारल्यावर अक्षयने त्या अनुभवाला फार महत्व न देता आपण गोमुत्र पित असतो असं सांगितंल. गोमुत्राचे आयुर्वेदातले फायदे त्याने सांगितलेच. शिवाय आपण रोज गोमुत्र न चुकता पितो असंही त्याने सांगितलंय.
अक्षयचं हे वक्तव्य बरंच व्हायरल झालं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी, आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्यांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. पण त्याच्यावर टीकाही तेवढ्याच प्रमाणात झाली आहे. अक्षय खोटं बोलत असल्याचा आरोप झाला आहे. आजवर अक्षयने कधीच ही गोष्ट सांगितली नाही. त्याने नेहमी आहार आणि व्यायाम यावर भर दिला होता. आता मात्र त्याचं हे बोलणं म्हणजे विशिष्ट समाजातल्या लोकांना खुश करण्यासाठी हे सगळं चालू असल्याबद्दल बोललं जातं आहे.
अक्षयच्या या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या टीकेवर पुन्हा अक्षय काही बोलला नाहीय. कारण सध्या तो बेल बॉटम या सिनेमाचं शूट करण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आहे. तो खरंच गोमुत्र पितो की त्याचा हा स्टंट असून सिनेमाचं प्रमोशन आहे यावरही बोललं जाऊ लागलं आहे. अक्षयने गेल्या काही वर्षापासून पंतप्रधानांसह अनेकांसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखतही त्याने घेतली होती. शिवाय केंद्राच्या अनेक योजनांना तो प्रमोटही करतो. त्यावरून केंद्रातल्या काही लोकांना खुश करण्यासाठी तो हे करत असल्याबद्दलही यावर टीका करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :