मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ही माहिती दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाही त्यांच्यासंदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय.
चव्हाण म्हणाले, आरक्षणाला राजकीय वळण देण्याचा काहींचा प्रयत्न आहे. अंतिम निर्णयापूर्वी मराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. तसेच काही जणांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आरक्षणाबाबत मंगळवारपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगितीवर तोडगा काढण्यास सरकार सक्षम आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेलं आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण देखील मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली होती. तर मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण देणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणी काय निकाल येते याकडे लक्ष आहे.