Maharashtra Shahir : ‘महाराष्ट्राचे शाहीर’ म्हणून ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष 3 सप्टेंबर रोजी सुरु झाले असून, त्यांच्या जीवनावर येत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या चित्रपटाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपटाबद्दल एकेक गोष्टी हळूहळू उलगडत असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल आणखी एक नवीन आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेंना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क सोशल मीडियावर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला (Jayesh Khare) निवडले आहे. जयेशने गायलेले हे गीत आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी, युट्यूबवरून चंद्रा गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला त्यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात गायची संधी दिली आहे. त्यामुळे सहावीतील जयेश एका रात्रीत हिरो झाला आहे.
‘चंद्रा’ गाण्यामुळे चर्चेत आलेला जयेश!
जयेश खरे हा शिर्डीजवळील राहुरीपासून 30 किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा. त्याच्या खडया आवाजात ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे जेव्हा ‘महाराष्ट्र शाहीर’चे संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी मनोमन याच्याकडूनच शाहिरांच्या लहानपणीचे गाणे गाऊन घ्यायचे ठरवले. यानंतर त्याचा शोध घेतला गेला. त्याला मुंबईला बोलावून अजय-अतुल यांनी दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजातील गाणे गाऊन घेतले.
‘महाराष्ट्र शाहीर’मधील गाण्यालाही दिला रांगडा आवाज
‘हे गाणे त्याने बेफाम गायले आहे. अजय-अतुल यांनी त्याच्यावर मेहनत घेऊन त्याच्यातील गुणवत्तेला 100 टक्के वाव देत त्याच्याकडून हे गाणे गाऊन घेतले आहे. हे गाणे यशराज स्टुडीओमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. या स्टुडीओची भव्यता पाहून हा मुलगा आनंदाला होता. पण त्याने या गाण्याला जो न्याय दिला आहे, त्याला तोड नाही. अर्थात हे सर्व श्रेय अजय-अतुल यांचे आहे. ते शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच हा व्हायरल झालेला व्हिडीओ त्यांच्यासमोर आला आणि त्यांनी गुणवत्ता हेरत त्याला परिसस्पर्श केला’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळे यांची नातू केदार शिंदे म्हणाले.
जयेश संधीचं सोनं करणार!
जयेश खरे हा अगदीच सर्वसामान्य घरातील सहावीतील मुलगा आहे. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. वर्षातील केवळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळते. मग उर्वरित दिवस शेतमजुरी करून ते घर आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. जयेश चार वर्षाचा असतानाच त्याच्या गाण्याच्या कलेबद्दल त्याच्या वडिलांना कळले आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आता मात्र जयेश घराघरात पोहोचला असून ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आपल्या आवाजाने तो लवकरच ग्लॅमरस दुनियेतील आश्वासक चेहरा म्हणून पुढे येणार आहे.
संबंधित बातम्या