Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
व्हिडीओ शेअर करत केदार शिंदेंनी लिहिले आहे, “चरित्रपट बनवताना कलाकाराने त्या व्यक्ती सारखं दिसणं खूप महत्वाचं असतं. ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय.. अंकुश ला शाहिरांसारखं दाखवण्यासाठी विक्रम गायकवाडांची संपूर्ण टीम, त्यातही महत्वाचं म्हणजे जगदीश येरे यांनी खूप मेहनत घेतली आहे. युगेशा ओंकार हिने वेशभूषेची बाजू सांभाळली. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट होती शाहीरांचा आत्मा. अंकुशमध्ये आणि त्या पोस्टर वरच्या एका फोटोमध्ये उतरवणे.. मेकअप, वेशभूषा हुबेहूब होऊ शकते पण जोवर कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडत नाही तोवर योग्य परिणाम साधता येत नाही.. हा परिणाम पोस्टर मधे साधण्यासाठी केलेले पडद्यामागचे प्रयत्न आज शेअर करतोय".
महाराष्ट्र शाहिराचा प्रेरणादायी जीवनपट महाराष्ट्राला अर्पण होणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. केदार शिंदे या सिनेमावर गेली अनेक वर्ष काम करत आहेत.
संबंधित बातम्या