Kedar Shinde : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर'(Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. केदार शिंदेंनी आता शाहीर साबळे यांच्यासंदर्भात माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे आजोबा म्हणजे शाहीर साबळे यांनी सिनेमातील गाणी जास्त का गायली नाहीत, याचा खुलासा केला आहे. ही पोस्ट शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी लिहिलेली आहे. पोस्ट शेअर करत करत त्यांनी दोन जुने फोटोदेखील शेअर केले आहेत.
काय आहे पोस्ट?
मराठी चित्रपटसृष्टीपासून बाबा तसे दूरच राहीले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना चित्रपटासाठी गाणी म्हणायच्या भरपूर ऑफर येत असत. पण बाबांनाच मुळात कुठल्याही प्रकारात बंदीस्त व्हायचच नव्हतं..लोकगीत आणि प्रहसनं, लोकनाट्य, मुक्तनाट्य या जीवंत प्रकारांमध्ये ते स्वत: जास्त सहज सादर करू शकत होते. पण मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांना कुणालाही नकार देणं फार अवघड जात असे.
नंतर ते नावारुपाला आल्यावर गाण्यासाठी येणाऱ्या ऑफरला नकार कसा द्यायचा या विचारात ते पडले..त्याकाळी लता मंगेशकर,आशा भोसले यांचा मराठीतही बराच बोलबाला होता आणि लता मंगेशकर शाहीरांनी इंडस्ट्रीत येऊन गायक म्हणून बस्तान बसवावं यासाठी लता मंगेशकरही अग्रही होत्या. पण शाहीरांना त्या वाटेला जायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळी गाण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे 300 रुपये आकारणाऱ्या लताबाईंपेक्षा जास्त म्हणजे 500 रुपये फी आकारायला सुरवात केली आणि ही मात्रा बरोबर लागू पडली..इतके पैसे मोजणं कुणालाही शक्य झालं नाही.
महाराष्ट्र शाहिराचा प्रेरणादायी जीवनपट महाराष्ट्राला अर्पण होणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा', 'जेजुरीच्या खंडेराया', 'या गो दांड्यावरून' ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत. प्रेक्षक या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत. शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या