Himachal Pradesh Bus Accident : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) मोठी दुर्घटना घडली आहे. आयआयटी बीएचयूच्या (IIT BHU) विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. हे विद्यार्थी वाराणसी आईआईटी (Banaras Hindu University) मधील आहेत.


सात विद्यार्थी ठार, 10 जण जखमी


हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील बंजार घाटीच्या घियागी परिसरात हा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 305 (NH-305) वर रविवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातात सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच विद्यार्थ्यांना कुल्लू येथील झोनल हॉस्पिटलमध्ये (Zonal Hospital) तर इतर पाच विद्यार्थ्यांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री हवामान खूपच खराब होते आणि चालकाला वळण घेताना याचा त्रास झाला. त्यानंतर बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली आहे.






पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पर्यटकांची बस दरीत पडल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. यासोबतच जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे'


महत्त्वाच्या इतर बातम्या