नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सलमान खान आणि त्याची बहिण अलवीरा खान याला चंदीगड पोलिसांनी एका समन्स बजावले आहे. त्यासोबतच या प्रकरणाशी संबंधित इतर सात जणांना देखील नोटीस पाठवले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडचे एसपी केतन बंसल म्हणाले, सलमान खानला 13 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.


सलमान खान आणि इतर लोकांना पाठवलेल्या नोटिसेवर व्यापारी अरुण गुप्ता म्हणाले, Being Human च्या दोन कर्मचाऱ्यांनी मला दोन शोरुम उघडण्यास सांगितले. त्यासाठी 2  कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी दबाव देखील आणला. तसेच सलमान खान या शोरूमचे उद्घाटन करण्यास येणार असे ही सांगितले. 






 


अरुण गुप्ता पुढे म्हणाले, शोरुम उघडल्यानंतर मला सामान मिळाले नाही. त्यांनी सलमान खानला भेटण्यासाठी सांगितले. मी सलमान खानला भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन देखील दिले. तक्रारदार व्यापाऱ्याने या संदर्भात एक व्हिडीओ देखील पोलिसांकडे सुपुर्त केला आहे. या गोष्टीला आता दीड वर्ष झाले आहे. सलमान खानशी पत्रव्यवहार देखील केला. परंतु माझ्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नाही. 


तक्रारदार अरूण गुप्ता यांनी 2018 मध्ये शोरुम उघडले होते. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील पोलिसांना दाखवला. यामध्ये सलमान खानने सांगितले आहे की, चंडीगडमध्ये एक बिइंग ह्युमनचे ज्वेलरी शोरुम उघडले आहे. गुप्ता यांनी आपल्या परिवारासोबतचा सलमान खान यांचा फोटो देखील दाखवला. उद्घाटनला सलमान येणार होता परंतु व्यस्त असल्या कारणाने उपस्थित राहता आले नाही. सलमानने त्याऐवजी आपल्या बहिणीचा पती आयुष शर्माला उद्घाटनासाठी पाठवले.