Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्यांचा हा वास्तवदर्शी चरित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत असून, 2023मध्ये हा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं धडाकेबाज पोस्टर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाँच करण्यात आले.


नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून निलेश नवलाखा यांनी ‘शाळा’, ‘अनुमती’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी निर्मिती केलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाचंही कौतुक झालं होतं.


पॉलिटिकल थ्रिलर विषयाची निवड


निलेश नवलाखा यांनी मराठी चित्रपटांना वास्तवाजवळ नेऊन चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ते आता स्वतः लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळले आहेत. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण या ताज्या आणि सामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडील उलथापालथींना भरलेल्या धारदार अशा पॉलिटिकल थ्रिलर विषयाची निवड केली आहे. ‘चाणक्य’ या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाची निर्मितीही ते स्वत: करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आखलेल्या कट-कारस्थानाची, तसेच शह-काटशह, राजकीय सूडनाट्‌य आणि गद्दारीची गोष्ट ‘चाणक्य’ प्रेक्षकांना सांगणार आहे.


‘चाणक्य’मध्ये दिसणार राजकारणातील थरारनाट्य


सभेसाठी जमलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणारा नेता आणि त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर असं दृश्य चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील राजकारणातील थरारनाट्य ‘चाणक्य’ चित्रपटातून उलगडणार असल्याचं स्पष्ट होतं. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रातही अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.


स्वप्नांचे बळी देऊन राज्य करणाऱ्या धुरंधरांची ही कथा!


‘चाणक्य’ चित्रपटाविषयी लेखक, दिग्दर्शक, निर्माता नीलेश नवलाखा म्हणाले, की ‘चाणक्य’ या चित्रपटातून अत्यंत टोकदार राजकीय कथा मांडली जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा चरित्रपट असेल. सत्तेसाठी सामान्यांच्या स्वप्नांचे बळी देऊन राज्य करणाऱ्या धुरंधरांची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 5 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!