Cannes Film Festival 2022 : फ्रान्समधील कान्स सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज कान्स येथे पोहोचत आहे. या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थपकीय संचालक विवेक भिमनवार, समन्वयक अशोक राणे, मनोज कदम तसेच या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या 'कारखानीसांची वारी', 'पोटरा ' आणि ' तिचं शहर होणं ' या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, शंकर धोत्रे, समीर थोरात, सिध्दार्थ मिश्रा, रसिका आगाशे याही सहभागी होत आहेत. 18 मे पासून सुरु झालेला हा चित्रपट महोत्सव येत्या 28 मे पर्यंत असणार आहे.
जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मिती आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांना अनुभव घेता यावा आणि मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचावा यादृष्टीने या शिष्टमंडळात यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांना कान्स फिल्म फेस्टिवल मधील फिल्म मार्केट हे चांगले माध्यम आहे आणि यात सहभागी होण्याची संधी मराठी त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. या महोत्सवातील इंडिया पॉवेलीयनचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. या पॅव्हेलियनमध्ये चित्रपट महोत्सवाच्या काळात सुरू असणाऱ्या चर्चासत्र आणि परस्पर संवादांच्या उपक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि सचिव सौरभ विजय हे सहभागी होणार आहेत.
भारतीय चित्रपटाच्या उद्योगात आणि विशेषतः हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत उपलब्ध असल्याने सहाजिकच चित्रपट उद्योगाच्या वाढीत चित्रनगरीचे मोठे योगदान आहे. कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवात चित्रपट नगरीतील सुविधा आणि उपलब्ध असणारे विविध स्पॉट बद्दल सादरीकरण करण्यात येणार आहे.
बॉलिवूड हे जगभरातील चित्रपट निर्मात्यांचे आकर्षणाचे केंद्र आहे. येथील चित्रपट निर्मिती बद्दल त्यांच्या मनात प्रचंड औत्सुक्य आहे या गोष्टी लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगभरातील निर्मात्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
- Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
- Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!
कान्स चित्रपट महोत्सवातील महाराष्ट्राच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील चित्रपट उद्योग वाढीस लागण्या बरोबरच विशेषतः फ्रान्स आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांना नवी दिशा मिळेल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने या चित्रपट महोत्सवात शिष्टमंडळाला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, अजित पवार त्याचप्रमाणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.