Raj Thackeray Pune Rally News Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता 22 मे रोजी होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. याआधी राज ठाकरे यांची सभा 21 मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र  प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे मुंबईला रवाना झाल्याने सभा रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु राज यांची पुण्यातील सभा 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे होणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.


राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर म्हणाले की,"नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. राज ठाकरे यांना बऱ्याच विषयांवर बोलायचं आहे, त्यामुळे त्यांनी ही सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे."


राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. याविषयी बाळा नांदगावकर म्हणाले की, "अयोध्या दौऱ्यावर आम्ही ठाम आहोत. दौरा रद्द केल्याचा निर्णय घेतलेला नाही." दरम्यान अयोध्या दौऱ्यासाठी मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत. 


तर पुणे दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे प्रकृती ठीक नसल्याने मुंबईत परतले. याबाबत बाळा नांदगावकर म्हणाले की, "राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत आहे. ती पुन्हा आता त्रास देत आहे."