Yashwantrao Chavan Natya Sankul : नाट्यरसिकांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या 'यशवंतराव नाट्यगृहात' (Yashwantrao Chavan Natya Sankul) लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवार 5 ऑगस्टला अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ (Vacuum Cleaner) आणि रविवार 6 ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे.


'व्हॅक्यूम क्लिनर' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या दोन्ही नाटकांचे यशवंत नाट्यगृहातील प्रयोग खूप खास असणार आहेत. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा  इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.


नाट्यरसिक सुखावले...   


नूतनीकरण करण्यात आल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल हे नाट्यगृह 1 ऑगस्ट पासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.


यशवंतराव नाट्य संकुलासोबत कलाकारांसह प्रेक्षकांचंही भावनिक नातं होतं. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस या नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. आता हे नाट्यसंकुल प्रेक्षकांसाठी आणि कलाकारांसाठी सज्ज आहे.


यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक, अद्ययावत सुविधा करण्यात आली आहे. अंतर्गत सजावट, ध्वनियंत्रणा, स्वच्छातागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या संकुलात पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. 30 मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरू झाले होते. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


'व्हॅक्यूम क्लीनर' या नाटकात अशोक सराफ आणि निर्मिती सराफ मुख्य भूमिकेत आहे. तन्वी पालव, मौसामी तोंडवळणकर, प्रथमेश चेउलकर हे कलाकारदेखील या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चिन्यम मांडलेकरने या नाटकाची लेखन, दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर दुसरीकडे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर आणि प्रतीक्षा शिवणकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 


संबंधित बातम्या


Marathi Drama : अन् मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी