N D Mahanor Passes Away: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर आज पळसखेडे या त्यांच्या मूळ गावी संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ना. धों. महानोर यांच्या निधनानं साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तसेच कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ना. धों. महानोर यांनी अनेक मराठी चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत. तसेच त्यांच्या अनेक कथासंग्रहांना वाचकांची विशेष पसंती मिळाली.
ना धों महानोर यांचा जन्म पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. ना. धों. महानोर यांनी निसर्गावर आधारित अनेक गाणी, कविता लिहिल्या. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना. धों. महानोर यांनी मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं.
चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एबीपी माझाला ना. धों. महानोर यांच्या गाण्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "एखाद्या कवीला चित्रपटासाठी गीतलेखनाची संधी मिळते तेव्हा त्या कवीच्या लेखन वैशिष्ट्यानुसार ती असणे आवश्यक असते. निसर्ग कवी म्हणून ओळखले गेलेल्या ना. धों. महानोर यांनी मोजक्याच चित्रपटांसाठी गीतलेखन केले. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांचे काव्यलेखन त्यांना साहित्यिक म्हणून ओळख देणारे ठरले. त्यांची ती ओळख चित्रपट काव्यलेखनात अधोरेखित होतेय."
ना धों महानोर यांनी या चित्रपटांमधील गाणी लिहिली
1977 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या "जैत रे जैत" या चित्रपटामधील गाणी देखील ना. धों. महानोर यांनी लिहिली आहेत. ना. धों. महानोर यांनी सर्जा , एक होता विदूषक,अबोली,मुक्ता,दोघी या चित्रपटांमधील गाणी लिहिली.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि शरद पवार या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: