Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही तिच्या नियमित जामीन याचिकेवरील सुनावणीसाठी आज (10 नोव्हेंबर) पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. कोर्टाने जॅकलिनच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसने ईडीवर (ED) काही आरोप केले आहेत. तसेच या सुनावणी दरम्यान ईडीला न्यायालयाच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागला. 


आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे जॅकलिननं सांगितले. या प्रकरणाची आजची सुनावणी  पूर्ण झाली आहे. न्यायालयाने उद्याचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयानं आजच्या सुनावणीमध्ये ईडीला काही प्रश्न विचारले आहेत. 


न्यायालयानं ईडीला प्रश्न विचारले
'एलओसी जारी करूनही तुम्ही जॅकलिनला अद्याप अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत. तुम्ही या प्रकरणात निवडक लोकांना अटक का करत आहात?' असा सवाल कोर्टानं ईडीला केला. 


जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीनं कोर्टात म्हटलं की, 'तिनं देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तिने तपासकर्त्यांना सहकार्य केले नाही. आम्ही आयुष्यात कधी 50 लाख पाहिले नाहीत आणि जॅकलिननं फक्त मजा करण्यासाठी 7.14 कोटी खर्च केले. जॅकलिननं पळून जाण्यासाठी प्रत्येक मार्गाचा अवलंब केला कारण तिच्याकडे पैसे आहेत.'


जॅकलिननं ईडीवर आरोप केला
जॅकलिननं आज कोर्टात ईडीवर काही आरोप केले. ती म्हणाली, मी माझ्या कामानिमित्त परदेशात जाते, पण मला परदेशात जाण्यासाठी आडवण्यात आलं. मी गेल्या वर्षी जानेवारीत आईला भेटायला जाणार होतो. पण मला जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर जॅकलीनने न्यायालयात सांगितले की, तिने याबाबत तपास यंत्रणेला मेलही केला होता, मात्र ईडीकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.


काल (10 नोव्हेंबर) संजय राऊत यांच्या जामीनावर निकाल देताना देखील पीएमएल कोर्टानं ईडीवर ताशेरे ओढले होते. ईडीने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक नसून ईडीने स्वत: च आरोपी निवडले असल्याचे विशेष कोर्टाने म्हटले. 


जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती. 


जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तिचा 'रामसेतू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:  


Jacqueline Fernandez: जामीन याचिकेच्या सुनावणीसाठी जॅकलिन फर्नांडिस पोहोचली कोर्टात; व्हिडीओ व्हायरल