मुंबई : बॉलिवूडचं एक हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं वृत्त आहे. नाही, नाही आम्ही आलिया-रणबीरच्या लग्नाविषयी बोलत नाही. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची तारीख ठरल्याचं म्हटलं जात आहे.
पुढच्याच महिन्यात मलायका-अर्जुन विवाहबंधनात अडकणार आहेत. 19 एप्रिलच्या मुहूर्तावर मलायका-अर्जुन लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ख्रिश्चन पद्धतीने मलायका-अर्जुन विवाहाच्या आणाभाका घेणार असल्याचं म्हटलं जातं.
मलायका-अर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. दोघं हातात हात घालून एकमेकांसोबत फिरताना अनेक वेळा दिसल्यामुळे अर्जुन-मलायका डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
कॉफी विथ करणमध्ये करण जोहरने दोघांनाही वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्यांच्या कथित अफेअरविषयी छेडलं होतं. मलायकाने लाजून प्रतिक्रिया दिली होती, तर अर्जुनला तू सिंगल आहेस का? हा प्रश्न विचारल्यावर त्याने नकारार्थी मान डोलावली होती. त्यामुळे चाणाक्ष प्रेक्षकांनी वेळीच ताडलं.
मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये तब्बल बारा वर्षांचं अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे. ती 45 वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या 33 वर्षांचा आहे. त्यामुळे दोघांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
दरम्यान, लग्नाला मलायकाच्या मैत्रिणी-अभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि त्यांची वांद्र्यात राहणाऱ्या मैत्रिणींची गँग उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत. रणवीर-दीपिकालाही लग्नाचं निमंत्रण असल्याची माहिती आहे. 'स्पॉटबॉय' या मनोरंजन वेब पोर्टलने याविषयी बातमी दिली आहे.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं.
यापूर्वी विराट-अनुष्का, प्रिती झिंटा, उर्मिला मातोंडकर, नेहा धुपिया यांनीही लपूनछपून लगीनगाठ बांधली होती. लग्न झाल्यानंतरच त्यांचे फोटो थेट सोशल मीडियावर आले. त्यामुळे मलायका-अर्जुनही त्यांचाच कित्ता गिरवण्याची चिन्हं आहेत.
मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या लग्नाची तारीख ठरली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2019 02:18 PM (IST)
अर्जुन-मलायकाच्या लग्नाला तिच्या मैत्रिणी-अभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि त्यांची वांद्र्यात राहणाऱ्या मैत्रिणींची गँग उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत. रणवीर-दीपिकालाही लग्नाचं निमंत्रण असल्याची माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -