मुंबई : युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढलं आहे, असा घणाघात काँग्रेस झेंडा हाती घेतलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला आहे. देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? असा थेट सवालही उर्मिलाने केला आहे. उर्मिलाने कालच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करुन सक्रीय राजकारणात उतरण्याचा मानस बोलून दाखवला होता.

'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावं' असं म्हटलं जातं, मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं, विकासाचं चित्र कुठे आहे? असे प्रश्न उर्मिलाने उपस्थित केले. विकासाची स्वप्न दाखवली गेली, मात्र प्रत्यक्षात परीकथा नसून पिशाच्चकथा झाली आहे, असा घणाघातही उर्मिलाने केला.

धर्म म्हणजे काय? खरा देशभक्त कोण? हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवालही उर्मिलाने भाजपला विचारला आहे. जी आश्वासनं दिली गेली, तो काळा पैसा, नोकऱ्या कुठे गेल्या? असा प्रश्नही उर्मिलाने उपस्थित केला.

'पिंजर', 'मैंने गांधी को नहीं मारा' यासारख्या चित्रपटातून मी सामाजिक विषय हाताळले. 'मैंने गांधी...' चित्रपटाच्या वेळी आठ वर्षांपूर्वी भाजप सरकार नव्हतं, मात्र गांधीजींच्या विचारांना कसं मारलं गेलं, हे मी बोललो होते, असं उर्मिलाने सांगितलं.


महिलांचे प्रश्न, कर, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचे विषय असल्याचं उर्मिलाने सांगितलं. धर्म-जात याआधारे विचारले जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत, व्यक्ती कोण आहे, ती काय बोलते, हे महत्वाचं असल्याचं उर्मिला म्हणाली. निवडणुकांमध्ये प्रचार करुन विचारसारणी लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचं उर्मिलाने सांगितलं.

राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने काल पक्षप्रवेश केला होता. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे.