लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने यावेळी सांगितलं. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचंही तिने सांगितलं.
उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं चर्चेत होती.
1977 साली वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी उर्मिलाने 'कर्म' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. 1980 मध्ये श्रीराम लागूंसोबत झाकोळ चित्रपटातही ती झळकली. वयाच्या नवव्या वर्षी (1983) तिने शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्ये केलेली भूमिका विशेष गाजली. 'लकडी की काठी...' हे तिचं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
उर्मिलाने तिच्या कारकीर्दीत रंगिला, सत्या, दौड, जुदाई, कौन, मस्त, खुबसूरत, जंगल, भूत, पिंजर अशा असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राम गोपाल वर्मासोबत तिचे बरेच चित्रपट गाजले. ईएमआय (2008) या चित्रपटानंतर ती हिंदीत मुख्य भूमिकेत झळकली नाही.
'हृदयनाथ' (2008) हा तिचा आयटम साँग असलेला मराठी चित्रपट. 'आजोबा' (2014) या मराठी चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा करताना ती मोठ्या पडद्यावर अखेरची दिसली होती.
दरम्यानच्या काळात झलक दिखला जा 2 (2007), मराठी पाऊल पडते पुढे (2011) डान्स महाराष्ट्र डान्स (2012) यासारख्या डान्स रिअॅलिटी शोजचं परीक्षण उर्मिलाने केलं.
नुकतंच 'ब्लॅकमेल' चित्रपटात उर्मिला 'बेवफा ब्यूटी' या आयटम नंबरमध्ये दिसली. तब्बल दहा वर्षांनी आयटम नंबरपुरतं का असेना बॉलिवूडमध्ये उर्मिलाचं पुनरागमन झालं.
'चायना गेट' चित्रपटातील 'छम्मा छम्मा'नंतर लज्जा, कंपनी सारख्या चित्रपटातही तिने आयटम नंबर केले होते. 2007 मध्ये 'राम गोपाल वर्मा की आग'मध्ये मेहबूबा या गाण्यातल्या तिच्या दिलखेच अदांनी प्रेक्षक घायाळ झाले.
3 मार्च 2016 रोजी उर्मिलाने वयाने दहा वर्षांनी तरुण असलेल्या बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत विवाहगाठ बांधली.
वयाच्या 45 व्या वर्षी उर्मिलाने राजकीय कारकीर्द सुरु केली. राहुल गांधींसोबत संजय निरुपम, मिलिंद देवरा यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत तिने पक्षप्रवेश केला.