Vivek Agnihotri : यंदाचं वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी फारसं चांगलं गेलेलं नाही. मात्र, काही चित्रपटांनी या काळातही चांगली कमाई केली आहे. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files). या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले. काश्मीरच्या खोऱ्यात पंडितांवर झालेले अमानुष अत्याचार या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी हा चित्रपट उत्तमरित्या साकारला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री अनेक विषयांवर आपली मतं मांडताना दिसतात. नुकतेच त्यांनी ‘बॉयकॉट बॉलिवूड’ (Boycott Bollywood) या ट्रेंडवर आपले मत व्यक्त केले आहे.
बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, हा एक चांगला ट्रेंड आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले की, हा मुद्दा अवघड आहे पण बॉयकॉट बॉलिवूड हा चांगला ट्रेंड आहे. यातून प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त असून, प्रेक्षकांना नेमकं काय हवंय हे कळत आहे.
मी ‘त्या’ बॉलिवूडमधला नाही!
विवेक अग्निहोत्री म्हणाले की, या ट्रेंडचा परिणाम शेवट खूप सकारात्मक असणार आहे. हे बॉलिवूडविरुद्धचे सांस्कृतिक बंड आहे. मात्र, यादरम्यान विवेकनेही आपण अशा बॉलिवूडचा भाग नसल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, ‘मी या बॉलिवूडचा भाग नाही, ज्यात सध्या प्रचलित असलेले फॉर्म्युले वापरले जातात. उलट मी यातून बाहेर पडून वेगळे हिंदी चित्रपट बनवतो.’
मी बॉलिवूडच्या विरोधात नाही : विवेक अग्निहोत्री
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता, तेव्हा विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटावरही बहिष्कार टाकण्यात आला होता, पण तरीही हा चित्रपट हिट झाला होता. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मी कोणाच्याही विरोधात नाही. मला फक्त फिल्म इंडस्ट्रीत सुधारणा करायची आहे. पीआर आणि स्टार्सवरून, प्रेक्षकांचा फोकस कथा आणि लेखनाकडे वळवला पाहिजे.
बॉलिवूडवर केली टीका
विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच बॉलिवूडवर टीका देखील केली होती. विवेक यांच्या मते, बॉलिवूड हे सामान्य माणसाला समजून घेण्याची जागा नाही. इतकेच नाही, तर विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडला प्रतिभेचे कब्रस्तान म्हटले होते. सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर विवेक अग्निहोत्री यांनी मोठे वक्तव्य केले होते. पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले होते की, बॉलिवूड जसे दिसते, तसे नाहीय. इथे स्वप्ने चिरडली जातात.
संबंधित बातम्या