Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) नुकतीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez)  चौकशी केली होती. या दरम्यान जॅकलिनबाबत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या चौकशीतून असे समोर आले आहे की, जॅकलिनला सुकेशशी लग्न करायचे होते. तर, जॅकलिनने अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान यांनाही आपल्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितले होते. मात्र, दोन्ही कलाकारांनी तिला सुकेशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. इतके इशारे देऊनही जॅकलिनने त्यांचं ऐकलं नाही आणि ती त्याला भेटत राहिली.


दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान, जॅकलिन फर्नांडिसने कबूल केले की, सुकेशच्या जीवनशैलीचा तिच्यावर खूप प्रभाव होता. या तपास पथकात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जॅकलिनच्या कोस्टार्सनी तिला सुकेशपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, तरीही ती सुकेशला भेटत राहिली आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत राहिली. जॅकलिनने अक्षय आणि सलमानला सांगितले की, तिला 'उद्योगपती आणि नेता' असणाऱ्या सुकेशसोबत लग्न करायचे आहे.


अभिनेत्रीला प्रभावित करण्यासाठी काहीही करण्याची तयारी...


या चौकशी दरम्यान जॅकलिनने पोलिसांना सांगितले की, तिला सुकेशच्या वैवाहिक जीवनाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि लीना मारिया पॉलसोबत तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिला सांगण्यात आले होते. सुकेशने जॅकलिनला प्रभावित करण्यासाठी तिच्या मॅनेजरला डुकाटी बाईकही भेट दिली होती, जी नंतर दिल्लीतून जप्त करण्यात आली आहे.


सत्य लपवल्याचा आरोप


दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, जॅकलिन फर्नांडिस आणि तिचे कुटुंब व मित्र यांना सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाची माहिती होती. मात्र, तरी या सर्वांना सुकेशकडून आर्थिक फायदा होत असल्याने अभिनेत्रीने सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाकडे दुर्लक्ष केले होते. चौकशी दरम्यान, पोलिसांनी जॅकलिनला 50 लेखी आणि 75 प्रश्न तोंडी प्रश्न विचारले. अनेक अभिनेत्रींची सुकेशशी ओळख करून देणाऱ्या पिंकी इराणीला आणि जॅकलिनला समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. दोघींनी एकमेकींवर सत्य लपवल्याचा आरोप केला.


जॅकलिनवर भेटवस्तूंची बरसात


सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) नाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता.


संबंधित बातम्या


Jacqueline Fernandez : 'नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?' जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल


Jacqueline Fernandez : "मी माझ्या कष्टाने संपत्ती कमावली"; मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण