Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.


पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी चांगली कमाई केली होती. मात्र, आता त्याची कमाईची गती काहीशी मंदावल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, आता दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली आहे.


भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘इतकी’ कमाई


'विक्रम वेधा'ने ओपनिंगच्या दिवशी 10.58 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार पदार्पण केले होते. पण, पहिल्या वीकेंडनंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण सुरू झाली. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दुसरा आठवडा झाला आहे. यामध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी थोडी चांगली असल्याचे दिसते आहे. चित्रपटाने गुरुवारी 3.26 कोटींचे कलेक्शन केले होते, त्यानंतर शुक्रवारी त्याची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटाने 2.54 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आणि चित्रपटाने 3.93 कोटींची कमाई केली. त्याचवेळी, आता या रविवारी या चित्रपटाने 4.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 69.54 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


काय आहे कथानक?


‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ आणि हृतिक यांच्यासोबतच रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'विक्रम वेधा' या अ‍ॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. 'विक्रम वेधा'ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर पोलीस असलेला विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधाचा (हृतिक रोशन) पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे.


हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे, ज्यात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ‘विक्रम वेधा’ची कथा भारतीय पौराणिक कथा ‘विक्रम वेताळ’वरून प्रेरित आहे. या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये, विक्रमची भूमिका माधवनने आणि वेधाची भूमिका विजय सेतुपतीने केली होती. तर, हिंदीमध्ये माधवनच्या जागी सैफ, तर विजयची जागा हृतिक रोशनने घेतली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!


Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..