Mahesh Tilekar : राणू मंडल हे नाव आठवतं का ? त्याच राणू मंडल ज्या दोन वर्षांपूर्वी एका रेल्वे स्थानकावर लता मंगेशकरांचे गाणे गाऊन चर्चेत आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर गाणं गात असतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गाण्यामुळे त्या रातोरात स्टार झाल्या होत्या. सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. दरम्यान निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या पाहण्यात एका अज्ञात गायिकेचा मराठी गीत गातानाचा व्हिडीओ आला.
महेश टिळेकर यांच्या पाहण्यात एका अज्ञात गायिकेचा मराठी गीत गातानाचा व्हिडीओ आल्यानंतर ते थेट त्या गायिकेला भेटायला तिच्या घरी पोहोचले. कोल्हाटिन समाजातील मंगल जावळे या एस टी स्टँड वर गाणी गाऊन मिळणाऱ्या शंभर दोनशे रुपयात घर चालवतात. गाण्याचे कसलेही शिक्षण न घेतलेल्या मंगल ताईंना सुंदर आवाजाची देणगी लाभली आहे. अशिक्षित असलेल्या मंगल ताई हिंदी, मराठी गाणी रेडीओवर ऐकून आपल्या आवाजात सादर करतात. त्यांच्या आवाजाने भारावून गेलेल्या महेश टिळेकर यांनी मंगल ताईंना पैठणी साडी आणि आर्थिक मदत सुध्दा केली आहे.
मंगल जावळे यांच्या वडिलांना गाणी गायला आवडायचे. त्यामुळे मंगल जावळे यांना देखील गाणी गाण्याची आवड निर्माण झाली. गाणं कसं गायला हवं त्याचे संस्कार बालपणी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केले आहेत. मंगल जावळे यांना लिहिता वाचता येत नसले तरी त्या उत्तम गातात. बालपणीपासून आतापर्यंत मंगल जावळे एस टी स्टँड वर गाणी गाऊन कुटुंब चालवतात. गाण्याच्या माध्यमातून मंगल जावळेंना केवळ 250-300 रुपये मिळतात. लता मंगेशकर, आशा भोसलेंची गाणी त्या तन्मयतेने गात असतात. मंगल दावळेंना सुंदर आवाजाची देणगी लाभलेली आहे. त्यामुळे इतरांनीही मंगल ताईंसारख्या कलाकारांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.
संबंधित बातम्या