मुंबई : 'आनंद', 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'बातों बातों में' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अर्थपूर्ण गाणी लिहून 70 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचं आज (30 मे) सकाळी निधन झालं. मुंबईतील गोरेगावमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. योगेश नावाने प्रसिद्ध असलेल्या योगेश गौर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 77 वर्षांचे होते आणि अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांचं किडनीशी निगडीत शस्त्रक्रियाही झाली होती.


जवळपास 50 वर्षांनंतरही 'आनंद' चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली 'कहीं दूर जब दिन ढल जाए' आणि 'जिंदगी कैसी है पहेली हाए' ही गाणी आजही संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. 'मंजिल', 'बातों बातों में', 'रजनीगंधा', 'छोटी सी बात' या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणीही फारच गाजली होती. गाणी लिहिण्याबाबत योगेश अतिशय काटेकोर होते. फारच कमी वेळेत त्यांनी अर्थपूर्ण गीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.


बासू चटर्जी दिग्दर्शित 'आनंद, 'रजनीगंधा' आणि 'छोटी सी बात' या चित्रपटांना संगीतकार सलिल चौधरी यांनी संगीत दिलं होतं. एबीपीसोबत बोलताना सलिल चौधरी यांचे पुत्र संजय चौधरी म्हणाले की, "योगेशजी बाबांना भेटण्यासाठी आमच्या घरी बऱ्याच येत असत. त्यांच्यासारखा विनम्र व्यक्ती मी जगात कुठेही पाहिला नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व फारच कमालीचं होतं."



संगीतकार निखिल-विनय जोडीने संगीतबद्ध केलेल्या 'बेवफा सनम', 'चोर और चांद', 'दुलारा' और 'इंग्लिश बाबू देसी मेम' यासारख्या चित्रपटांसाठीही योगेश यांनी गाणी लिहिली होती. विनय यांनी एबीपीशी बोलताना सांगितलं की, 'आम्ही या इंडस्ट्रीत अगदी नवखे होतो. आमच्यासाठी गीत लिहिण्याची कोणीही तयार होत नसे. अशावेळी योगेशजी यांनी आम्हाला साथ दिली. विनम्रतेशिवाय लोकांची मदद करण्यासाठी कायम तत्पर असणं हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं.


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनही ट्वीट करुन योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "मनाला भिडणारी गाणी लिहिणाऱ्या योगेशजी यांचं निधन झाल्याचं मला नुकतंच समजलं. मला अतिशय दु:ख झालं. योगेशजी यांनी लिहिलेली गाणी मी गायली आहेत. योगेशजी अतिशय शांत आणि मधुर स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते."





1943 मध्ये उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात जन्मलेल्या योगेश यांनी 'एक रात', 'मंजिलें और भी हैं', 'आजा मेरी जान', 'प्रियतमा', 'दिल्लीगी', 'पंसद अपनी अपनी', 'हनीमून', 'अपने-पराये', 'लाखों की बात', 'किरायेदार' यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.