1971 चा काळ… रंगभूमीवर वादळ आलं... प्रायोगिक नाट्यचळवळ दुभंगली गेली. रंगायनमध्ये फुट पडली आणि त्यानंतर एक रंगभूमीवर नवा आविष्कार जन्माला आला. विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडेंनी या स्वप्नाला एक मूर्त रुप दिलं. मराठी प्रायोगिक नाटकांसाठीचं असणारं सर्वात मोठं व्यासपीठ त्याकाळीही आविष्कारच मानलं गेलं जिथे खऱ्या अर्थाने प्रयोग होत राहिले, वादग्रस्त नाटकांचेही प्रयोग तितक्याच सातत्याने व्हावेत आणि बालनाट्याची चळवळ राज्यभरात रुजावी यासाठी सुलभाताईंनी दिलेलं योगदान मोलाचं आहे. आजही आपल्या मनात राहतील सुलभाताई त्या बेणारे बाई म्हणून... शांतता! कोर्ट चालू आहे.


 



 

पंडित सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर आणि अरविंद देशपांडे यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना मूर्त रुप देणाऱ्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणून सुलभाताईंनी मोलाचं योगदान दिलं आहे. अरुण काकडे अन् सुलभा देशपांडे यांनी पडद्यामागे राहून आविष्कारच्या नाट्यचळवळीला कायम बळकटी दिली.

 



छबिलदासमधल्या मुलांच्या शाळेच शिक्षिक असताना त्या मुलांसाठी विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाटकं तिथे सादर होत. त्यानंतर मराठी रंगभूमीवरचे नवनवे प्रयोगाची ती नांदी होती. रंगायननंतर छबिलदास हे प्रायोगिक नाटकांचं आश्रयस्थान होण्यामधलं महत्त्वाचं योगदान हे सुलभाताईंचं होतं हे आवर्जून सांगावं लागेल. आशय जपत नावीन्यपूर्ण प्रयोग करत कायम आविष्कारमध्ये करत राहण्यामध्ये सुलभाताईंचं योगदान मोलाचं आहे. चंद्रशालासारखा वेगळी शाखा केवळ बालनाट्यासाठी वाहून घेतली आणि त्याच्या प्रमुख होत्या सुलभाताई. 2008 साली बालनाटयाला हक्काची जागा मिळावी, यासाठी विजय तेंडुलकरांच्यासोबत रस्त्यावर उतरुन आंदोलनही त्यांनी केलं होतं.

 

 

पं. सत्यदेव दुबे, श्याम बेनेगेल, डॉ.जब्बार पटेल, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांसारख्या प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांसोबत काम करताना त्यांच्या अभिनयाला कायम पैलू पडत राहिले. केवळ प्रायोगिक रंगभूमीपर्यंतच आपलं अस्तित्व मर्यादित न ठेवता मराठी-हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला.

 



बालनाट्यांमधलं त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. दुर्गा झाली गौरीसारखा एक वेगळा प्रयोग दरवर्षी नव्या कलासंचासह त्यांनी सादर केला. बाबा हरवले आहेत, राजाराणीला घाम हवा, पंडित. पंडित तुझी अक्कल शेंडित ही बालनाट्य त्यांनी दिग्दर्शितही केली.

 

 

1987 साली त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच 6 वर्षांपूर्वी तन्वीर सन्मानानेही गौरवण्यात आलं होतं. यासोबत नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर आणि कुसुमाग्रजपुरस्कारासोबत रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं.



 

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मराठी सिनेसृष्टीचा सोज्वळ चेहरा आज आपल्यातून गेला असला तरी त्यांच्या कलाकृतींमधून त्या आपल्या मनात कायम राहतील.

 

 

एबीपी माझा अन् ढॅण्टॅढॅणची त्यांना विनम्र श्रद्धांजली.