V. Shantaram : भारतीय सिनेसृष्टीचे पितामह शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम (V. Shantaram) यांची आज जयंती आहे. 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शन क्षेत्रात कामगिरी बजावली. सुमारे सहा दशकं ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला एका पेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. 


व्ही. शांताराम यांनी लहान वयातच 1914-15 साली गंधर्व नाटक कंपनीत प्रवेश मिळवला. त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून त्यांनी 'सुरेखा हरण' या मूकपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. बाबुराव पेंटर दिग्दर्शित या पहिल्याच सिनेमात ते कृष्णाच्या भूमिकेत होते. 


व्ही. शांताराम यांचे गाजलेले सिनेमे -


'सिंहगड','श्रीकृष्णावतार','सती पद्मिनी','शहाला शह','सावकारी पाश','राणा हमीर','माया बाजार','गजगौरी','भक्त प्रल्हाद','मुरलीवाला','सती सावित्री','महारथी कर्ण' आणि 'बाजीप्रभू देशपांडे' हे व्ही. शांताराम यांचे गाजलेले ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमे आहेत. 1927 साली 'नेताजी पालकर' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. व्ही. शांताराम यांचा 'संत तुकाराम' हा सिनेमा जगातील तीन सिनेमांतील एक उल्लेखनीय सिनेमा मानला जातो. 


एकीकडे पौराणिक सिनेमा बनवीत असतानाच शांताराम बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक सिनेमांची निर्मिती केली. जरठ विवाहावर टीका करणारा 'कुंकू', वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा 'माणूस', हिंदू-मुस्लिक दंगलीच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा 'शेजारी' हे त्यांचे सामाजिक संदेश देणारे सिनेमेदेखील अफाट गाजले.


शांताराम आधी प्रभात फिल्म्स कंपनीत काम करायचे. मात्र नंतर त्यांनी राजकमल कालामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी चालू केली. त्यांनी सिने-निर्मितीच्या नवनवीन शैली निर्माण केल्या. सामाजिक, कौटुंबिक विषयांवर अर्थपूर्ण सिनेमांच्या निर्मितीसाठी ते ओळखले जात. कलात्मक सिनेनिर्मिती हे व्ही. शांताराम यांचे खास वैशिष्ट्य समजले जाते.


भारतीय सिनेमाला योग्य दिशा


व्ही. शांताराम यांनी अभिनेता म्हणून 25 सिनेमांत काम केलं आहे. तर 92 सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच 55 सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी 1933 साली पहिला रंगीत सिनेमा बनवला. मराठीसह त्यांनी हिंदी-सिनेसृष्टीतदेखील काम केलं आहे. भारतीय सिनेमाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. 


व्ही. शांताराम यांच्या सिनेमांनी घेतला रसिकांच्या काळजाचा ठाव


'नवरंग', 'पिंजरा', 'दो आँखे बारह हाथ', 'चानी', 'बूंद जो बन गये मोती', 'गीत गाया पत्थरों' हे व्ही शांताराम यांचे सिनेमे रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात. भारतीय सिनेसृष्टीचे सर्वोच्च 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आणि 'पद्मविभूषण'ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1990 साली वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.


संबंधित बातम्या


Shreeram Lagoo Birth Anniversary : शंभरहून अधिक एकांकिका, 150 हून अधिक मराठी-हिंदी सिनेमे; तब्बल दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'नटसम्राट'